एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:38 AM2020-09-30T00:38:49+5:302020-09-30T00:39:00+5:30
तिसऱ्या तक्रारीवरुन कारवाई : बिल्डरकडे ३५ लाखांची मागणी
भिवंडी : एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख याच्यासह त्याच्या आणखी दोघा साथीदारांवर मंगळवारी खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. एक लाखाची लाच घेताना गुड्डू व त्याच्या साथीदारांवर २५ सप्टेंबर रोजी पहिला गुन्हा दाखल केला. २७ सप्टेंबर रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला असून मंगळवारी गुड्डू व त्याच्या दोन साथीदारांविरोधात ३५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
बिल्डर शाहिद अ. मकबूल अहमद शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी निजाम यास अटक केली असून रियाज याचा शोध सुरु आहे.
न्यायालयात केली होती याचिका दाखल
समदनगर येथील बिल्डर शाहिद अहमद मकबूल अहमद शेख यांच्या तक्रारीनुसार, माशाअल्ला इमारत बेकायदा असल्याबाबत गुड्डू याच्या सांगण्यावरून त्याचे हस्तक रियाज व निजाम यांनी उच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर फिर्यादीस गुड्डू याच्या कार्यालयात बोलावून तक्रार मागे घ्यायची असल्यास ३५ लाख खंडणीची मागणी केली. ती दिल्यास याचिका मागे घेतो अन्यथा इमारत पाडण्याची धमकी दिली होती.