खंडणी प्रकरण : दोन आरोपी थेट दाऊदच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:43 AM2018-03-10T03:43:23+5:302018-03-10T03:43:23+5:30
गोराई येथील जागेच्या वादातून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून, ते थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे - गोराई येथील जागेच्या वादातून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून, ते थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील भार्इंदर येथील एका व्यापा-याने, गोराई येथील ३८ एकर जागेचा सौदा २00७ साली मुंबईतील खार येथील टोनी लेविस याच्याशी केला होता. त्यासाठी या व्यापा-याने दोन कोटी रुपये टोनी लेविसला दिले होता. मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच जमिनीच्या वाढलेल्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाले. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच, टोनी लेविस याने जमीन मुंबई येथील भवर कोठारी आणि भरत कोठारी यांच्या नावे केली. बाजारभावाप्रमाणे ३५ कोटी रुपये किंमत असलेल्या या जमिनीच्या व्यवहारातून बाजूला होण्यासाठी, तक्रारदार व्यापा-यास कासकरसह अनिस इब्राहिमनेही धमक्या दिल्या. इक्बालच्या अटकेनंतर भवर कोठारी आणि भरत कोठारी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत. कोठारी हा दाऊदसोबत एके काळी सोने-चांदीची तस्करी करायचा. जैनही दाऊदच्या थेट संपर्कात असून, तो पाकिस्तानला जाऊन आला असल्याची माहिती, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. दोघेही देशाबाहेर फरार झाले असून, ते इंडोनेशिया अथवा कोलंबियात असावेत, अशी शंका शर्मा यांनी व्यक्त केली.
कासकरवर ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी गोराई येथील जागेच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात, दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिमही आरोपी आहेत.
हवालामार्फत दाऊदला पैसा
खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी करताना, इक्बाल कासकरने पोलिसांना डी-कंपनीच्या अर्थकारणाचीही माहिती दिली. खंडणीच्या गुन्ह्यातून जमवलेले दीडशे कोटी रुपये दाऊदला हवालामार्फत पाठविण्यात आले होते, असे इक्बालने पोलिसांना सांगितले. त्यापैकी काही रक्कम आपणासही हवालामार्फत मिळाली होती, अशी कबुलीही इक्बालने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.