मोपलवारांकडे मागितली खंडणी; मांगले दाम्पत्यास अटक, संभाषण रेकॉर्ड करून करत होता ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 06:10 AM2017-11-04T06:10:11+5:302017-11-04T06:10:11+5:30
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणा-या व बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) व त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री श्रद्धा हिला ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.
- पंकज रोडेकर
ठाणे : वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणाºया व बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) व त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री श्रद्धा हिला ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. या दोघांचा साथीदार अनिल वेदमेहता हा सध्या फरार आहे.
मोपलवार यांच्याकडे १० कोटींची मागणी करणा-या मांगले याला एक कोटी रुपये घेताना पोलिसांनी पकडले. मांगले हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असून, याच ओळखीमुळे तो मोपलवार यांच्या संपर्कात आला. मात्र, मांगले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर बलात्कारासह दोन गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. मांगलेच्या घरातून दोन लॅपटॉप, ५ मोबाइल, ४ पेनड्राइव्ह, १५ सीडी व अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोपलवार यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत एक संदिग्ध ध्वनिफीत
१ आॅगस्ट २०१७ रोजी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित केली गेली होती. ती मांगले याने वृत्तवाहिनीला पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर, मांगले दाम्पत्याने विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना भेटून तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून मोपलवार यांच्यावर आरोप सुरू केले. त्यांनी मोपलवार यांच्याविरोधात वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडे तक्रारी करण्याचा सपाटा लावला. त्यानंतर, २३ आॅक्टोबर २०१७ रोजी मांगले दाम्पत्य आणि अनिल वेदमेहता यांनी मोपलवार यांच्या ओळखीच्या क्लिंग मिश्रा यांच्याशी संपर्क साधून मोपलवार यांना नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे बोलावले. मोपलवार यांच्याविरुद्ध
केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी थांबविण्याकरिता तसेच आपल्याकडे असलेले कॉल रेकॉर्डिंग परत करण्यासाठी १० कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर, भिवंडी, वरपे येथील शांग्रीला हॉटेल येथे पुन्हा भेटून तीच मागणी करण्यात आली. ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी मांगले दाम्पत्याने मुंबईत मोपलवार यांची तिसºयांदा भेट घेऊन सात कोटी रुपयांपर्यंत तडजोड करण्याची तयारी दाखवली. मात्र, सात कोटी रुपये न दिल्यास तसेच पोलिसात तक्रार केल्यास मोपलवार आणि त्यांची कन्या तन्वी असे दोघांना ठार मारण्याची धमकी मांगले याने दिली. तडजोडीतील एक कोटी रुपये गुरुवारी रात्री मांगले याच्या डोंबिवलीतील भाड्याच्या घरात देण्याचे ठरले. त्यानुसार, ही रक्कम देण्यापूर्वी मोपलवार यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाक डे तक्रार केली. त्यानुसार, पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने सापळा रचून मांगले याला डोंबिवलीतील घरातून अटक केली. कळवा पोलीस ठाण्यात मांगलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची साथीदार श्रद्धा हिला मीरा रोड येथून अटक केली. त्यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माझ्यावर खोटेनाटे आरोप झाल्याने माझी बदनामी झाली. हा आघात आमच्या संपूर्ण कुटुंबाला सोसावा लागला. माझ्या आईच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. मुलीमध्ये नैराश्य निर्माण झाले. आता कदाचित सर्वांना माझी बाजू पटेल. मात्र, त्यामुळे माझे झालेले नुकसान भरून येणार नाही. संतोष मांगले हा खंडणीखोर असल्याचे मी सुरुवातीपासून सांगत होतो. मात्र, कुणी माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. त्याने माझ्या फोन कॉल्सशी छेडछाड करून बनावट चित्र उभे केले. त्यामुळे माझ्या एवढ्या वर्षांच्या सेवेवर विनाकारण कलंक लागला.
- राधेश्याम मोपलवार,
वरिष्ठ सनदी अधिकारी