भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:34 PM2020-02-28T12:34:16+5:302020-02-28T12:35:31+5:30

Narendra Mehta: पोलिसांनी मेहताच्या गोल्डन नेस्ट येथील शगुन बंगल्यावर शोध घेतला असता मेहता पसार झाल्याचे आढळून आले आहे.

A rape case has been registered against BJP leader and former MLA Narendra Mehta Pnm | भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार

Next

मीरारोड - मागासवर्गीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून गरोदर ठेवणे व मुल जन्मास घालणे, सत्ता व पदाच्या धाक धमकीने सतत लैंगिक शोषण करणे आदी प्रकरणी मीरा भाईंदर भाजपाचे वादग्रस्त नेते, माजी आमदार नरेंद्र मेहतावर मीरारोड पोलीस ठाण्यात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा व अन्य कलमांखाली शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहतांचा साथीदार संजय थरथरेसुद्धा आरोपी आहे. पोलीस मेहतांच्या बंगल्यावर अटक करण्यासाठी गेले असता ते पसार झाले. विधी मंडळाच्या चालू अधिवेशनात मेहतांच्या महिला नगरसेविकेच्या शोषणचा मुद्दा गाजला होता व गृहमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.

पीडित महिला नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मेहताने लग्नाचे आमिष दाखवून गोड बोलून महिला व तिच्या कुटुंबीयांशी जवळीक साधली. पण पीडिता ही मागासवर्गिय असल्याने उघडपणे लग्नास नकार देत १३ जुन २००१ रोजी मेहताने व पिडीतेशी डहाणू येथील मंदिरात लग्न केले . घरचे जातीमुळे लग्नास होकार देणार नाहीत म्हणून योग्य वेळ आली की सर्वांसमक्ष लग्न करु असे आश्वासन दिले. मंदिरात लग्न झाले असल्याने आता आपण पती पत्नी आहोत सांगून मेहताने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध ठेवले. मेहता राजकारणात उतरुन २००२ च्या पालिका निवडणुकीत मेहता अपक्ष म्हणुन निवडणुक लढले व जिंकले.

त्याच दरम्यान पीडित महिला मेहतांपासुन गर्भवती राहिली. पण राजकिय कारकिर्दीवर परिणाम होईल म्हणून लग्न व गरोदर असल्याची बाब लपवून ठेवण्यास मेहताने सांगीतले. लग्न व पीडिता गर्भवती असल्याची माहिती असून देखील मेहतांनी १६ जानेवारी २००३ रोजी सुमन सिंग सोबत दुसरे लग्न केले. २२ मार्च २००३ रोजी पिडीता बाळंत झाली. पण नगरसेवक आणि दुसरे लग्न झाल्यानंतर मात्र मेहताने पीडित महिला व नवजात बाळाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. जातीचा प्रश्न तसेच राजकिय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होईल म्हणून लग्न व मुलास स्वीकारण्यास नकार देत शिवीगाळ केली. पण त्या नंतर देखील नगरसेवक पद व सत्तेचा धाक तसेच पीडितेस मारहाण करुन बाळासह मारुन टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरुच ठेवले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी मेहताने पिडीतेला नोकरी सोड सांगून निवडणुकीत मदत करायला सांगीतले. पीडितेने निवडणुकीत मेहताला मदत केली तसेच दबावाखाली सांगेल तसे वागू लागली. मेहता त्याच्या फायद्यासाठी पीडितेचा वापर करत होते व २०१२ साली तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. दरम्यान पीडितेने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. मेहताचा राजकीय दबदबा वाढू लागल्याने ती दबावाखालीच राहू लागली. २०१५ मध्ये आमदार मेहताने पीडितेस नागपूर अधिवेशनला बोलावून तीचे विमान तिकीट काढल्याचे सुमन मेहतांना कळल्यानंतर बराच वाद झाला होता. पीडितेच्या मुलास सुमन यांनी त्यांच्या शाळेतून काढून टाकले. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने पिडीतेच्या मुलास शाळेत घेण्याचे आदेश दिले. त्याला शाळेत घेतले पण नंतर त्याची तुकडी बंद करण्यासह फुटबॉल संघाच्या कप्तान पदावरुन सुमन यांच्या शाळेने मुलास काढून टाकले. त्याचा मुलावर विपरीत परिणाम होऊन देखील वडील म्हणून मेहताने काहीच केले नाही.

त्याच वेळी मेहताचा मित्र संजय थरथरे याने थेट पीडितेच्या कार्यालयात जाऊन मेहता सांगेल तसं वाग, त्याच्या विरोधात जाणे महागात पडेल. तो सीएमचा खास असून सत्तापण त्याची असल्याने तुला महागात पडेल अशी धमकी दिली. तसेच मुलासह दुबईला निघून जाण्यास सांगितले. घाबरुन ती मुलासह निघुन गेली पण आठवड्याभराने परत आली. मुलगा हा मेहताचा असल्याने पिडीता कायदेशीर तक्रार करेल असे वाटल्याने मेहताने नेहमीच सत्ता आणि पदामुळे दबाव व धाकात ठेवले. तसेच लैंगिक शोषण सुरु ठेवले प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात नरेंद्र लालचंद मेहता ( ४८ ) सह त्याचा साथीदार संजय थरथरे विरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मेहताच्या गोल्डन नेस्ट येथील शगुन बंगल्यावर शोध घेतला असता मेहता पसार झाल्याचे आढळून आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असले तरी राजकीय दबदबा असणारा माजी आमदार त्यांच्या हाती लागेल का ? असा प्रश्न देखील नागरीकांमधून केला जात आहे. मेहता हे विरोधी पक्षनेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. मेहता सातत्याने वादग्रस्त राहिले असुन त्यांच्यावर आता पर्यंत सुमारे २० च्या घरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: A rape case has been registered against BJP leader and former MLA Narendra Mehta Pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.