शिवसेना पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:35 AM2020-02-08T01:35:30+5:302020-02-08T06:34:49+5:30
शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव आणि उद्योजक साईनाथ तारे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
कल्याण : शिवसेनाठाणे ग्रामीण जिल्हा सचिव आणि उद्योजक साईनाथ तारे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन निर्जनस्थळी कारमध्ये हे कृत्य केल्याची तक्रार एका ३० वर्षीय पीडित विवाहितेने दिली होती. तारे यांनी आरोपाचे खंडण करत पैसे उकळण्यासाठी हा बनाव केल्याचे म्हटले आहे.
२०१८ मध्ये तारे यांनी पीडितेला व्यवसायात भागीदार करण्यासाठी कल्याण पूर्वेतील मॉलमध्ये बोलावले होते. पीडितेने भागीदारीत व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तारे यांनी अश्लील शेरेबाजी करत तिच्याशी लगट केली. त्यानंतर, पीडितेच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो व मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
तसेच तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ न पत्रीपुलाजवळ निर्जनस्थळी तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. याची कुठे वाच्यता केल्यास तुझी मुलगी आणि पतीला ठार मारू, असे धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, तिच्याकडून कोणतीही तक्रार नसल्याबाबत नोटरीवर लिहूनही घेतले होते. यानंतरही छळ सुरू राहिल्याने पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
कॉल रेकॉर्ड तपासा, सत्य बाहेर येईल!
तारे यांनी पीडितेचे आरोप फेटाळले आहेत. विधानसभा निवडणुकीत या महिलेने मला बदनामी करण्याची धमकी दिली. पैशांच्या हव्यासापोटी खोटे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासावेत. त्यातून सत्य बाहेर येईल. नाहक बदनामी केल्याने तिच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी तारे यांनी केली.