अंबरनाथमध्ये अज्ञात बंदुकधा-यानं प्रियकराची हत्या करत प्रेयसीवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 10:14 PM2018-03-05T22:14:46+5:302018-03-05T22:14:46+5:30
अंबरनात चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली.
अंबरनाथ : अंबरनाथ चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या प्रियकरांच्या छातीवर बंदूक ठेवत त्याला घाबरविले. तसेच त्या तरुणाच्या प्रेयसीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यास प्रियकराने विरोध करताच बंदुकधारी लुटारुने त्या तरुणावर गोळीबार केला. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी हा रस्ता रात्रीच्या वेळी सुमसाम असतो. या रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने हवेशीर ठिकाणी अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या भागात येत असतात. मात्र याच रस्त्याच्या पुढच्या भागात अनेक जोडपी एकांत शोधत दुचाकीवर बसून गप्पा मारत असतात. अशाच प्रकारे शहापूर अस्नोली गावात राहणारा तरुण गणेश दिनकर हा आपल्या प्रेयसीसोबत अंबरनाथच्या नालंबी येथील रस्त्याच्या बाजूला बसला होता.
गणेश हा शहापूरचा रहिवासी असला तरी आपल्या नातेवाईकाच्या चायनिजच्या दुकानात काम पाहत होता. त्यामुळे त्याचे वास्तव्य अंबरनाथचेच होते. गणेश आणि तिच्या प्रेयसीचे गेल्या 7 वर्षांपासून प्रेमसंबंधी होते. गणेश हा आपल्या नातेवाईकाची बुलेट गाडी घरातून काढून बाहेर पडला. प्रेयसीला सोबत घेऊन तो त्या डोंगरावर बसलेला असताना एक करुण मागून आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची आणि बुलेटची चावी मागितली. त्यानंतर गणेशच्या प्रेयसीवर बलात्कार केला. त्याला विरोध करण्यासाठी गणेश पुढे सरसावताच त्या लुटारूने त्याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले.
दरम्यान, त्या तरुणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करून पळून गेला, असे पीडित मुलीनेच स्पष्ट केले. आरोपी पळून गेल्यावर त्या तरुणीने येणा-या-जाणा-यांकडे मदत मागितली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असली तरी अंबरनाथ पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे.