कल्याण स्थानकात बलात्कार
By admin | Published: September 23, 2016 03:20 AM2016-09-23T03:20:55+5:302016-09-23T03:20:55+5:30
लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर अनिल अवसरमोल याने कल्याण रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे
कल्याण : लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर अनिल अवसरमोल याने कल्याण रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पीडित मुलीवर पश्चिमेतील टावरीपाडा येथील घरीही अवसरमोल याने अत्याचार केला आहे. खडकपाडा पोलिसांनी मात्र दाखल झालेल्या तक्रारीवरून अवसरमोलविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
कल्याण रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २ वरील मुंबईच्या दिशेकडील शौचालयात २७ आॅगस्टच्या रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. या शौचालयाचा वापर होत नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु, कल्याण स्थानकावर ही अत्याचाराची घटना घडल्याने तेथील एकंदरीतच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, हा प्रकार आपल्या हद्दीत घडलाच नाही, अशी भूमिका लोहमार्ग पोलिसांची असल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ‘लोकमत’ने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत राणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
दरम्यान, ३० आॅगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यानही अवसरमोल याने त्याच्या टावरीपाडा येथील घरीही पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी मुलीने खडकपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सा) अंतर्गत अवसरमोल याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.