कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा
By अजित मांडके | Updated: April 5, 2023 14:37 IST2023-04-05T14:37:11+5:302023-04-05T14:37:39+5:30
महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा
ठाणे : कोरोना आणि एच ३ एन ३ इनफ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण ठाणे शहरात वाढू लागल्याने ठाणेकरांमध्ये चिंता वाढली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सर्तक झाली आहे. शहरात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३३४ एवढी आहे. यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इनफ्ल्युएंझा आजाराचे २९ रुग्ण आतापर्यंत शहरात आढळले आहेत. त्यातील दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार शहरात नव्याने सहा रुग्णांचा मृत्यू मागील काही दिवसात झाल्याचे दिसत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे मानले जात असले तरी देखील १ एप्रिल पासून कोव्हॅक्सिन आणि १ फेब्रुवारी पासून कोव्हीशिल्ड लसच उपलब्ध होऊ न शकल्याने लसीकरण देखील बंद असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसात कोरोनासह एच ३ एन २ इनफ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला कोरोनाच्या नवीन ३३४ सक्रीय रुग्ण दिसत आहेत. तर मंगळवारी शहरात ४१ नवे रुग्ण आढळून आले होते. तर आतापर्यंत या आजाराने ४ जणांचा मृत्यु झाला आहे. मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत महापालिका हद्दीत झपाट्यान वाढ होतांना दिसत आहे. तसेच एच ३ एन २ इनफ्ल्युएंझा रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
सध्या महापालिका मंगळवारी नव्या शुन्य रुग्णांची भर पडली असली तरी देखील आतापर्यंत २९ रुग्ण आढळले आहेत. ५ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या ९ एवढी आहे. तर आतापर्यंत १३ रुग्णांनी या आजारावर मात केल्याचे दिसून आले आहे. तसेच यात दोघांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे.