मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:43 AM2020-08-15T04:43:42+5:302020-08-15T04:44:33+5:30
मुंबईची पाणीचिंता मिटणार; धरणकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील बारवी धरणासह मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे या धरणांखालील गावांना ती भरण्याआधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. यात मोडकसागरच्या काठावरील ४२ गावांचा समावेश आहे. पाणीसाठा वाढल्याने मुंबईची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी, गावपाड्यांना या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याची पातळी शुक्रवारी ६८ मीटर असून यंदा स्वयंचलित गेट बंद करून ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठवण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्यातील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यामुळे पिंपळोली, चांदप, दहागाव, चोन, कोऱ्याचापाडा, तारण, अस्नोली या बारवी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
या धरणात २४ तासांत २१४ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटणपाड हे पाणलोट क्षेत्र मिळून पडलेल्या या पावसाची सरासरी ४८ मिमी नोंद झाली आहे. सध्या त्याची पाणीपातळी ६८ मीटर असून ६३.२८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९९.१८ टक्के होता. आंध्रात काही दिवसांच्या तुलनेत बºययापैकी ७४ मिमी, भातसा ७६ मिमी, तर मोडकसागरमध्ये ८९, तानसात ५० मिमी, मध्य वैतरणात ९० मिमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी अवघा ३१ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडल्याची नोंद झाली आहे. यापैकी ठाणे परिसरात ३८ मिमी, कल्याणला १५, मुरबाड २५, भिवंडीला ३१, शहापूरला ४६, उल्हासनगर २८ आणि अंबरनाथला २७ मिमी पाऊस पडला आहे.
मोडकसागर-तानसाची आजची स्थिती
मोडकसागर धरणाची पाणीपातळी शुक्रवारी १२ वाजता १५९.६७ मीटर असून ते भरून वाहण्याची पातळी १६३.१५ मीटर आहे. पाऊस पाहता ते कधीही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे वैतरणा नदीकाठावरील ४२ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यामध्ये दाधारे, जोशीपाडा, कळंबे, शेले, तिळसे, पोपरोली, धिंडेपाडा, अनशेत, गाले, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स, शीळ,अब्जे अलमन, कुतल, बोरंदे, आवंदेध, नाने, गलतरे, हमरापूर ही सर्व २४ गावपाडे वाडा तालुक्यातील आहेत. तर, पालघर तालुक्यातील १८ गावे या वैतरणा नदीकाठावर आहेत. तर, तानसा धरण १२५.९६ मीटर भरले असून ते ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.