अंबरनाथ, बदलापूरच्या बाजारपेठांमध्ये तुरळक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:30+5:302021-09-06T04:44:30+5:30
अंबरनाथमधील स्टेशनच्या बाजारपेठेत रविवारी सकाळी काही प्रमाणात गर्दी दिसली. मात्र, त्यापैकी बहुसंख्य ग्राहक हे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आले ...
अंबरनाथमधील स्टेशनच्या बाजारपेठेत रविवारी सकाळी काही प्रमाणात गर्दी दिसली. मात्र, त्यापैकी बहुसंख्य ग्राहक हे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच ग्राहक आले. सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्याचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सव काळामध्ये विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली जात असली, तरी अंबरनाथच्या बाजारपेठेमध्ये या साहित्यांच्या दुकानांत गर्दी कमी होती. गणेशोत्सव काळामध्ये नवीन कपडे घेणाऱ्या ग्राहकांची संख्यादेखील तुरळक होती.
बदलापुरात सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी चांगली गर्दी झाली होती. कपडे खरेदी करणाऱ्या दुकानांमध्येदेखील गर्दी होती. पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांत अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती. अंबरनाथ आणि बदलापूरचे बहुसंख्य ग्राहक कपडे, विद्युत रोषणाईचे साहित्य आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी उल्हासनगर आणि कल्याणच्या बाजारपेठांमध्ये जात असल्याने अंबरनाथ आणि बदलापूरच्या बाजारपेठेमध्ये गर्दी कमी दिसत होती.
-----------------