दुर्मीळ कासवांची तस्करी उधळली
By admin | Published: July 4, 2017 06:48 AM2017-07-04T06:48:59+5:302017-07-04T06:48:59+5:30
अतिशय दुर्मीळ असलेल्या स्टार कासवांच्या २०० पिलांची तस्करी करणाऱ्या विजय सागेराम (२१) आणि जोत्री सागेराम (४०) या बापलेकाला
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अतिशय दुर्मीळ असलेल्या स्टार कासवांच्या २०० पिलांची तस्करी करणाऱ्या विजय सागेराम (२१) आणि जोत्री सागेराम (४०) या बापलेकाला वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या नवी मुंबई कार्यालयाच्या पथकाने आणि वन विभागाने सापळा रचून सोमवारी कल्याण रेल्वेस्थानकातून पकडले. ते दोघे कनार्टकातून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्टार कासवे घरात अथवा नोकरी-व्यवसायात वापरल्यास बरकत येते, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. बंगळूर येथील दोन व्यक्ती कासवांची २०० पिले घेऊन कल्याण स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी २ वाजता कल्याण स्टेशन परिसरात यांनी सापळा लावला होता. लोकमान्य टिळक-एर्नाकुलम एक्स्प्रेस कल्याणला येताच त्यातून दोन व्यक्ती उतरल्या. पार्किंगजवळ या पिलांची तस्करी करत असताना त्यांना पकडले.