कचऱ्यावरून दिव्यात उद्या होणार राडा; खर्डी पुलावर होणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:43 AM2018-12-31T00:43:59+5:302018-12-31T00:44:06+5:30
ठाणे महापालिकेच्या महासभेत कच-यावरून रणकंदन झाल्यानंतर १ जानेवारीपासून शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कच-याच्या गाड्या परतवण्याचे आंदोलन सुरू होणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत कच-यावरून रणकंदन झाल्यानंतर १ जानेवारीपासून शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कच-याच्या गाड्या परतवण्याचे आंदोलन सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खर्डी पुलावर जोरदार आंदोलन होणार आहे. त्यामुळे रोज निर्माण होणारा कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
ठाणे शहरातून गोळा झालेला ७५० मेट्रीक टन कचरा रोज दिव्यातील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. सध्या येथील कचरा साठवण्याची क्षमता संपली असतानाही ठामपाकडून पर्यायी व्यवस्था होत नसल्याने दिवावासीयांमध्ये नाराजी आहे. गेल्या काही महिन्यांत येथील कचºयाला अधूनमधून आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा धूर दिव्यात पसरून नागरिकांना अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. कचºयाच्या दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी महासभेत दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांनी आवाज उठवत नागरिकांना भेडसावणाºया त्रासाचा पाढाच वाचला होता. अधिकाºयांनी एक दिवस दिव्यात राहायला यावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. कचरागाड्या थांबवल्या नाहीत, तर १ जानेवारी रोजी दिव्यातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी खर्डी येथील पुलावर शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन होणार आहे. यावेळी येथील नगरसेवक आणि शिवसैनिकांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतील. शीळफाटा येथील वनविभागाच्या खदाणीमध्ये डम्पिंग हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ठाण्यातून येणाºया कचरागाड्या थांबवून त्यांना परतवण्यात येणार असल्याने रोज शेकडो मेट्रीक टन निर्माण होणारा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
सत्ताधारीच करतात आंदोलन
ठाणे महापालिकेत शिवसेनेची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. डम्पिंगबाबत दिवेकरांच्या संतप्त भावना असतानाही डम्पिंग हलवण्याबाबत शिवसेनेने हालचाल केली नाही. सध्या डम्पिंगविरोधात शिवसेना नगरसेवक रस्त्यावर उतरले असून हा घरचा आहेर असल्याची टीका भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.