सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने आगपाखड करीत दिला आयुक्तांना जाहीर पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:12 PM2018-03-30T17:12:55+5:302018-03-30T17:12:55+5:30
सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे.
ठाणे - एकीकडे सत्ताधारी शिवसेनेने काही मुद्यावरुंन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात मोहीम उघडून आपली तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला असतांनाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र आयुक्तांच्या भुमिकेचे जणू समर्थनच करत त्यांना जाहीर पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांच्या वादात राष्ट्रवादीने आयुक्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसापासून महासभेच्या निमित्ताने आणि रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन महापौर आणि आयुक्तांमध्ये विस्तवाची ठिणगी पडली आहे. त्यात जलवाहतुकीचे सादरीकरण करतांना लोकप्रतिनिधींना डावलल्याने सत्ताधाऱ्यांनी एक प्रकारे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून आले होते. परंतु येत्या काही महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असल्याने त्याचा फटका आपल्याला बसू शकतो, आणि आयुक्त गेले तर काही प्रकल्प देखील रखडू शकतात म्हणूनच की काय शिवसेनेने आयुक्तांच्या विरोधात उघडलेला मोर्चा मागे घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या काही दिवसात या वादावर पडदा पडण्याची चिन्हे देखील शिवसेनेने दिली आहेत. असे असतांना आता विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला असून आयुक्तांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जे प्रकल्प मार्गी लावलेच नाहीत, किंवा ज्यासाठी प्रयत्नच करण्यात आले नाहीत, अशा प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठीचा हा अट्टाहास असल्याचा आरोप शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. तर आयुक्तांना पाठींबा देतांना जे आयुक्त दिवसातील २० -२० तास काम करतात त्यांच्या बाबत अशा पध्दतीने शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मतही राष्ट्रवादीने व्यक्त केले आहे. नागला बंदर पासून ते आनंद नगर जकात नाक्यापर्यंत आणि खिडकाळी पासून ते वागळे इस्टेटच्या डोंगरापर्यंत अशा दाही दिशांना विकासाची गंगा वाहत आहे. या शहराती सर्व सामान्य नागरीकांना शहरात असलेल्या विकासाचा फायदा होतांना दिसत आहे. त्यांची जीवनशैली सुधारत आहे. असे असतांना सत्ताधारी शिवसेनेने अशा पध्दतीने चांगल्या कामात दुधात मीठ टाकण्याचाच प्रयत्न केल्याचा टोलाही शिवसेनेला लगावला आहे.