रुग्णवाढ असतानाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:56+5:302021-04-20T04:41:56+5:30

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही काही दिवसांत वाढले आहे. परंतु, ...

The rate of contact tracing decreased despite the increase in morbidity | रुग्णवाढ असतानाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले

रुग्णवाढ असतानाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही काही दिवसांत वाढले आहे. परंतु, असे असले तरी एखाद्या बाधित झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांचे ट्रेसिंगही आता घटू लागले आहे. तसेच जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत, अशांवर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात होते. परंतु, आता तेदेखील होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, घरी उपचार घेणा-या रुग्णांना महापालिका केवळ आता फोनवरूनच संपर्क साधत आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख सहा हजार ३२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील ८९ हजार २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, एक हजार ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ हजार ६२९ रुग्णांवर सध्या प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत. यातील ११ हजार ४४५ रुग्ण घरीच विलगीकरणात असून सौम्य लक्षणे असलेल्या ६३० रुग्णांवर भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात उपचार सुरू आहेत. तर, यातील तीन हजार १०७ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. तर, ५९२ रुग्ण हे आयसीयूमध्ये असून १६८ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घरी उपचार घेणा-या रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारले जावेत, असे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. सुरुवातीला काही दिवस ही प्रथा सुरू होती. अशा रुग्णांच्या हातावर शिक्के मारतानाच त्याच्या घराबाहेर स्टिकरदेखील लावले जात होते. परंतु, मागील काही दिवसांपासून ही प्रथाच बंद केली आहे. या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची माहिती महापालिकेने दिली होती. मात्र, या कामासाठी लागणारी शाईच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे एखाद्या इमारतीत किंवा झोपडपट्टीत रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्यांना विलगीकरण केंद्रात पाठविले जात होते. परंतु, आता ही प्रथादेखील महापालिकेकडून बंद झाली असून सुरुवातीला एकास ४५ असे प्रमाण होते. ते आता ३५ च्या घरात आले आहे. परंतु, ते कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची शोधमोहीमच बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही आता एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जर कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नसतील, तर त्याला घरीच उपचार घेण्यासाठी सांगितले जाते. परंतु, त्याच्याशी केवळ फोनवरून एकदाच संपर्क साधला जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अशा रुग्णांसाठी औषधे दिली जात होती. तसेच त्याच्या संपर्कातील त्याच्या घरातील मंडळींनादेखील खबरदारी म्हणून औषधे दिली जात होती. शिवाय, ऑक्सिमीटरच्या माध्यमातून त्या रुग्णांची तपासणी केली जात होती. परंतु, आता केवळ एकदाच फोनवरून संपर्क साधला जात असून त्यानंतर त्या रुग्णाचे काय झाले, तो बरा झाला की नाही, याची कोणतीही माहिती घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे.

Web Title: The rate of contact tracing decreased despite the increase in morbidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.