कोपरीतील एक हजार कुटुंबांना रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू
By अजित मांडके | Published: October 24, 2023 01:28 PM2023-10-24T13:28:39+5:302023-10-24T13:29:17+5:30
काही तांत्रिक कारणांमुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांच्या रेशनकार्डचे आधार सिडिंग झाले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेशनकार्डला आधारकार्ड सिडिंग न झाल्यामुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांचा आठ महिन्यांपासून बंद झालेला रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रहिवाशांना न्याय मिळवून दिला.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार, रेशनकार्ड व आधारकार्ड लिंक करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांच्या रेशनकार्डचे आधार सिडिंग झाले नव्हते. त्यामुळे आठ महिन्यांपासून सर्व कुटुंबांचे रेशनकार्ड अपात्र ठरून धान्यपुरवठा बंद झाला होता. त्याचा सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांना फटका बसला होता. या रहिवाशांना नाईलाजाने बाजारपेठेतून महागड्या दराने धान्य घ्यावे लागत होते. त्यामुळे त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले होते. तसेच अनेक रहिवाशांना केंद्र व राज्य सरकारच्या मोफत धान्य योजनेचा फायदा घेता येत नव्हता.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची व्यथा जाणून घेऊन भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण यांनी ठाणे येथील शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण व शिधावाटप निरीक्षक संजय निनावे यांना निवेदन दिले होते. तसेच त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर या संदर्भातील सर्व त्रूटी दूर करण्यात येऊन, एक हजारांहून अधिक रहिवाशांची रेशनकार्ड पात्र करण्यात आली. तसेच या महिन्यापासून सर्वच्या सर्व एक हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू करण्याचे निर्देश शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी दिले. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात धान्य मिळाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.