रेशनच्या धान्याची पोल्ट्री फार्म किंवा जनावरांच्या खाद्यात भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:50+5:302021-09-14T04:47:50+5:30
ठाणे : जिल्ह्यात जवळजवळ सव्वाआठ लाख लाभार्थी शासनाच्या या अन्नधान्याचे लाभार्थी आहेत. मात्र, यातील बहुतांशी लोक स्वस्तात मिळालेले अन्नधान्य ...
ठाणे : जिल्ह्यात जवळजवळ सव्वाआठ लाख लाभार्थी शासनाच्या या अन्नधान्याचे लाभार्थी आहेत. मात्र, यातील बहुतांशी लोक स्वस्तात मिळालेले अन्नधान्य अन्यत्र विकून चरितार्थ चालवत आहेत. अत्यल्प कमी भावाने म्हणजे तीन रुपये किंवा त्यापेक्षाही कमी दराने खरेदी करून त्या धान्याची काळ्या बाजारात सात ते पंधरा रुपये किलोने विक्री करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. गोरगरिबांचे धान्य चढ्या भावाने काळ्या बाजारात जाते तर सडलेले धान्य पोल्ट्री फार्म किंवा जनावरांच्या खाद्यात भेसळ करून त्याची विक्री केली जाते. यामध्ये दुकानदार, पुरवठा विभाग, स्थानिक पोलीस स्थानक आणि संबंधित जिल्हास्तरीय सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून बहुतांशी लाभार्थी या अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. कोरोना कालावधीत मोफत अन्नधान्याचा लाभ सर्वांनाच मिळाला. गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांनी कधी गरजूंना तर काहींनी काळ्या बाजारात धान्य विकून त्याचे अमाप पैसे केले. सध्याही प्रति व्यक्ती तीन किलो गहू दोन रुपये दराने आणि दोन किलो तांदूळ तीन रुपये दराने शिधावाटप दुकानातून घेतला जात आहे. पण काही लाभार्थी या अन्नधान्याला काळ्या बाजारात विकून त्याचे पैसे करत आहेत. तर काही व्यसनी लाभार्थी या अन्नधान्याला विकून त्यांच्या सवयी पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. यात अनेक ठिकाणी दलाल मालामाल झाले आहेत.
मुरबाड तालुक्यात एकूण १९६ रास्त भाव दुकाने आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीत उपासमार होऊ नये, म्हणून शासनाकडून धान्य पुरवठा झाला. मात्र, कार्डधारकांना शासनाचे नियमानुसार धान्य पुरवठा होत नसल्याचा आरोप ऐकायला मिळत आहे. कार्डधारक रेशन घ्यायला आला नाही तर त्याचे धान्य शिल्लक राहते. तो काही दिवसांनी आलाच तर त्याला १०० ते १५० रुपये देऊन त्याचे सुमारे ४०० ते ५०० रुपयांचे धान्य दलाल खरेदी करून घेत आहेत. दलालाकडून प्रत्येकी १५ रुपये किलो दराने तांदूळ आणि १० रुपये किलो दराने गहू विकला जातो. काही ठिकाणी तर परस्पर गोदामातून तो धान्याची गाडी लंपास करत असल्याचा आरोपही ऐकायला मिळत आहे. मात्र, दुकानदार या महिन्याचा कोटा मला मिळाला नाही, असे कार्डधारकांना पटवून देतात.
---------