मध्यमवर्गीयांना आधार आता रेशन दुकानांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:55 AM2020-04-26T00:55:53+5:302020-04-26T00:56:09+5:30
अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत.
ठाणे : मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्याच्या खरेदीसाठी जाणे स्टेटस सिम्बॉल मानणाऱ्या मध्यमवर्गीयांना सध्याच्या लॉकडाउनच्या काळात रेशन दुकानांचा आधार वाटू लागला आहे. अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत अनेक केशरी कार्डधारक रेशन दुकानाच्या रांगेत उभे राहणे टाळत होते.
शहरांतील रेशनदुकानांमधून धान्य मिळावे, यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमांतर्गत समावेश न झालेल्या व केशरी कार्डधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५९ हजारांपेक्षा जास्त व एक लाखांपर्यंत असणाºया एपील (केशरी) कार्डधारकांना गहू आठ रुपये प्रति किलो, गहू, व तांदूळ रुपये १२ रुपये प्रति किलोने मिळणार आहे. मे आणि जूनसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ, असे पाच किलो धान्य दिले जात आहे. प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांना एप्रिलचे धान्य तसेच प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ दिला जात आहे.
होलसेल बाजारपेठेमध्ये जे धान्य मिळेल ते खरेदी करून विकण्यासाठी रिटेल दुकानदारांची धडपड सुरू आहे. खुल्या बाजारात गहू सरासरी २८ ते ४० पर्यंत, तांदूळ ४५ ते ७० पर्यंत प्रति किलो विविध प्रत-वाणानुसार उपलब्ध आहे. तर, चणाडाळ ८० ते ९० रुपये, मूग डाळ १४० रुपये, तूरडाळ १००-११०, मसूरडाळ ७० ते ७५, साखर ४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर, रेशनवर उपलब्धतेनुसार तूरडाळ ५५ रुपये, चणाडाळ ४५ रुपये प्रति किलोने मिळते. रेशनवरील धान्य स्वस्त असल्याने मध्यमवर्गीय ते खरेदी करत आहेत.
‘माझ्याकडील गहू व तांदूळ संपला आहे. सर्व माल थेट दुकानात येत नाही. वाशी एपीएमसीतून तो आणावा लागतो. वाहतूक खर्च वाढला आहे. काही वस्तू मिळत नसल्याने त्या महागल्या आहेत,’ असे दुकानदार विजय गुप्ता म्हणाले.
>... असेही पुण्यकर्म
हातावर पोट असलेल्यांना सध्या मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी काही मध्यमवर्गीय पुढे सरसावले आहेत. काहींनी आपले रेशनवरील धान्य घेऊन ते घरेलू कामगार, वाहनचालक, सोसायटीतील सुरक्षारक्षक, कचरा नेण्यासाठी येणारे कामगार, लॉण्ड्री व्यावसायिक यांना दिले आहे. रेशनकार्डवरील धान्य वाया जाण्यापेक्षा ते गरजूंना मिळावे, हीच यामागची भूमिका असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.