ठाण्यात आयोजित खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 04:20 PM2018-08-15T16:20:00+5:302018-08-15T16:27:35+5:30
अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा आयोजित खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली.
ठाणे : अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्यावतीने खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरीच्या अजिंक्य केसकर व चिन्मय जोशी यांनी बाजी मारुन प्रथम क्रमांक पटकावला. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे ही स्पर्धा पार पडली.
दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे दहावे वर्ष होते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी ९ ते रात्री आठ वाजेपर्यंत स्पर्धा सुरू होती. प्रत्येक स्पर्धाला सादरीकरणासाठी दहा मिनिटे देण्यात आली होती. यात स्पर्धकांनी सामाजिक, चालू घडामोडींवर स्कीटच्या माध्यमातून प्रकाश टाकला काहींनी विनोदी स्कीट तर काींनी नाटकातील प्रवेश सादर केले. स्पर्धेचे परिक्षण दिग्दर्शक, अभिनेते हेमंत भालेकर आणि अभिनेत्री अंजली वळसंगकर यांनी केले. द्वितीय पारितोषिक अवंतिका चौगुले (परेल) व सुहास शिंदे (डोंबिवली) तृतीय पारितोषिक अश्लेषा गाडे (कळवा) व सिद्धेश शिंदे (ठाणे) यांनी पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार दत्ताराम भालेकर (मुलुंड) व भैरवी गोरेगावकर (कळवा), उत्तेजनार्थ द्वितीय पुरस्कार रुहल गोसावी (मुंबई) व रिया हडकर (मुंबई) तर विशेष गुणवत्तामध्ये अमिष कुलकर्णी, हेअरड्रेसर अनुष्का राऊत यांना गौरविण्यात आले. खास परिक्षकांच्या आग्रहाखातर कल्याणचा साकार देसाई व श्रृती तांबडे यांना विशेष उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्यांना तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र विशेष गुणवत्ता विजेत्यांना प्रमाणपत्र परिक्षकांच्या हस्ते देण्यात आले. द्विपात्री स्पर्धा ही मी स्वत:च्या संकल्पनेतून सुरू केली होती. यंदाच्या स्पर्धेला गेल्यावर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद होता असे स्पर्धेचे संयोजक दुर्गेश आकेरकर यांनी सांगितले.