पन्नास हजार खर्चूनही उंदीर कारमध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:06 AM2020-08-11T01:06:00+5:302020-08-11T01:07:13+5:30
माउस प्रोटेक्टर निष्फळ; महिलेची फसवणूक
ठाणे : एका नामांकित कारउत्पादक कंपनीच्या 'कार'नाम्यामुळे ठाण्यातील महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कार कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपच्या माध्यमातून तब्बल ५० हजारांचा माउस प्रोटेक्टर (उंदीर पळवण्याचे यंत्र) कारमध्ये बसवूनदेखील उंदीरमामा काही पळालेच नाहीत. उलट, कारमध्येच मुक्काम ठोकलेल्या उंदरांनी कारच्या वायरिंगचे नुकसान केल्याने कारमालकिणीला नाहक मनस्ताप सोसावा लागला. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तिने कारकंपनीविरोधात थेट पोलिसात तक्रार दिली आहे.
ठाण्यातील राबोडीच्या साकेत कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या इलिशा व अब्दुल खान या दाम्पत्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. २०१७ मध्ये इलिशा यांनी आलिशान आॅडी कार घेतली. मात्र, काही महिन्यांतच पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारमध्ये उंदरांनी धुमाकूळ घालून कारची वायरिंग क्षतिग्रस्त केल्याने खान यांची कार नादुरुस्त झाली.
दुरुस्तीसाठी कार वागळे इस्टेटमधील आॅडीच्या अधिकृत कार्यशाळेत नेली. तेव्हा तेथील मेकॅनिकने उंदरांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी कारमध्ये ५० हजार किमतीचा 'माउस प्रोटेक्टर' बसवला. त्यानंतर, लॉकडाऊन सुरू झाल्याने कार इमारतीच्या आवारातच उभी होती. २७ जुलै रोजी खान दाम्पत्याने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा पूर्वीचीच समस्या उद्भवली. त्यानंतर कार्यशाळेत कार दाखवली असता, मेकॅनिकने उंदरांचे कारनामे सुरूच असून दुरुस्तीसाठी दोन लाखांचा खर्च खान यांना सांगितला. माऊस प्रोटेक्टरचा खर्च करुनही उपयोग न झाल्याने खान यांनी कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार केली.
पोलिसांकडे तक्रार
५० हजारांचा 'माउस प्रोटेक्टर' बसवूनही उदरांनी कारचे नुकसान केल्याने हा खर्च काय कामाचा, असा प्रश्न कारमालक खान यांनी विचारला. त्यांची कार्यशाळेने दखल न घेतल्याने अशाप्रकारे इतर कुणाची अशी फसवणूक होऊ नये, तसेच कार्यशाळेला अद्दल घडवण्यासाठी खान यांनी राबोडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, याप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत.