ठाण्याच्या बालमहोत्सवात बालकलाकारांनी उडवली धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:31 AM2020-01-21T01:31:20+5:302020-01-21T01:32:18+5:30
लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांचे सूत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, आणि भव्य पारितोषिक सोहळा या विविध कार्यक्रमांनी रविवारचा बालमहोत्सव हसतखेळत आणि उत्साहात रंगला.
ठाणे : लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांचे सूत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, आणि भव्य पारितोषिक सोहळा या विविध कार्यक्रमांनी रविवारचा बालमहोत्सव हसतखेळत आणि उत्साहात रंगला. यावेळी बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना पटवर्धन यांनी प्रारंभ कला अॅकॅडमी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभ कला अॅकॅडमी आणि भूमी वर्ल्ड यांच्यावतीने रविवारी गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, बालरंगभूमीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या राजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नरेश म्हस्के म्हणाले की, भावी पिढीला संस्कार देण्याचे काम ही मंचावरील सगळी मंडळी नि:स्वार्थीपणे करीत आहेत, म्हणूनच ती पुरस्काराला पात्र आहेत. अशा मंडळींचे कौतुक करणे हेच आमचे काम आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तुलालवार म्हणाले की, बालक्षेत्रात काम करणाºया शहरांत ठाणे अव्वल आहे. सर्वाधिक नाट्यसंस्था याच शहरात आहेत. वर्षाला सर्वाधिक नाट्यप्रयोग याच शहरात होतात. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अणखी वाढली आहे. अॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी बालकलाकारांना जशी शिस्त असते तशी बालप्रेक्षकांनाही असावी आणि याची जबाबदारी पालकांची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई दूरदर्शनचे जयू भाटकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. स्टँडअप कॉमेडीयन अमोल सोनी यांनी लहान मुलांसाठी आकर्षक खेळ घेऊन त्यांचे मनोरंजन केले. आपल्या पाल्याबरोबर वडिलांनी सहभागी होण्याच्या खेळाने तर प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. विशेष म्हणजे मुलांनी काढलेल्या चित्रांनी रंगमंच सजविण्यात आला होता. मुलांनी बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन रंगमंचासमोर मांडले होते. सिंधुदुर्गच्या चेतन गंगावणे यांनी सादर केलेले कळसुत्री नाटक हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.