भाजपा कल्याण जिल्हाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
By admin | Published: January 16, 2016 12:31 AM2016-01-16T00:31:47+5:302016-01-16T00:31:47+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांना पक्षाने कल्याण जिल्हाध्यक्षपद देत जिल्ह्याचा
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांना पक्षाने कल्याण जिल्हाध्यक्षपद देत जिल्ह्याचा कारभार सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी दिली. शुक्रवारी माजी जिल्हाध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा करून पदभार सोपवला.
जिल्हाध्यक्षासाठी चव्हाण वगळता कोणतीही नावे चर्चेत नव्हती. त्यामुळे त्यांची सहज निवड झाल्याचे सांगण्यात आले. याआधी निवडणुकीत त्यांनी निवडणूक प्रचारप्रमुख हे महत्त्वाचे पद सांभाळले होते. त्याआधी ते डोंबिवली मतदारसंघातून दोन वेळा भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देऊन त्यांनी डोंबिवलीतून २१ जागांवर पक्षाचे नगरसेवक निवडून दिले होते. त्याच वेळी त्यांच्या पक्षबांधणीचे कौशल्य निदर्शनास आले होते. त्याच वेळी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला होता. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी डोंबिवली दौऱ्यावर होते, त्याच वेळी हे नाव निश्चित झाले. त्याची घोषण़ा फक्त शुक्रवारी करण्यात आला.
आता लक्ष ठाण्यावर
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले. आता ठाण्यातील ताकद वाढविण्यावर भाजपाने भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आधी ठाणे शहराचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. २००२ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत लेले कोपरीतून निवडून आले होते. मात्र २०१२ ला त्यांचा पराभव झाला. भाजपाच्या ठाणे शहर अध्यक्षपदी निवड होण्याची लेले यांची दुसरी वेळ आहे. लेले यांच्या रूपाने पक्षाने शहाराच्या संघटनेला तरूण चेहरा दिला आहे.
ठाणे शहर अध्यक्षपदी संदीप लेले
शिवसेनेविरोधात पालिका निवडणूक लढविण्यासाठीच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संदीप लेले यांची निवड करण्यात आली. येत्या वर्षभरात मोर्चे-आंदोलने आदी माध्यमातून पक्षात चैतन्य निर्माण करून सत्तारूढ शिवसेनेला जेरीस आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे कळते.
यापूर्वी ठाणे शहरातून आमदार म्हणून निवडून आलेल्या संजय केळकर यांच्याकडे हे पद होते, परंतु या पदावर काम करण्यास ते सुरवातीपासूनच इच्छुक नव्हते. त्यांनी हे पद इतर व्यक्तीला देण्याची विनंती आधीच पक्षश्रेंष्ठीकडे केली होती. मात्र वर्षभरावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीची तयारी म्हणून लेले यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.