केडीएमसीच्या रखडलेल्या विकासकामांबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 06:12 PM2020-02-10T18:12:00+5:302020-02-10T18:12:31+5:30
कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार चव्हाण यांनी या विकासकामांबाबत सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आसूड ओढत हा आंदोलनाचा इशारा दिला.
आमदार चव्हाण यांनी आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड, कोपर रेल्वे पूल, डोंबिवलीतील सूतिकागृह, शास्त्रीनगर आणि रुख्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था, 27 गावातील रखडलेली अमृत योजना, पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे, डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी हायस्कूलजवळील पुलाचे काम, ठाकुर्ली स्टेशनच्या दिशेने रखडलेला रस्ता, जोशी हायस्कुलजवळील पुलावरून 90 फूट रस्त्याला मिळणाऱ्या एलिव्हेटेड पुलाचे रखडलेले काम, केडीएमसीच्या डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंग प्लाझा-कार्यालयांची व्यवस्थेबाबत निविदा, डोंबिवली पूर्वेतील पाटकर प्लाझामध्ये रिक्षा स्टँड त्वरित सुरू करणे, डोंबिवली पश्चिमेत नविन मच्छी मार्केट बांधणे, डोंबिवली शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पश्चिमेला वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, स्मार्टसिटी योजनेंतर्गत 300 कोटी रुपये येऊनही एकही काम सुरू नाही, सुरक्षेबरोबरच स्वच्छतेसाठी कचरा पडत असणाऱ्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवा, केडीएमसी हद्दीतील भुयारी गटारांची, मल-जल शुद्धीकरणाची रखडलेली कामे, झोपडपट्टीत वाईट अवस्थेत असणारी शौचालये तातडीने बांधावीत, शास्त्रीनगर रुग्णालयात शव विच्छेदन कक्ष सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावी आणि कल्याण डोंबिवलीतील महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला गती येण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच 27 गावातील नागरिकांना सध्या आकारण्यात येत असलेला कर हा अन्यायकारक असून त्याबाबत फेरविचार करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.