अंधकारमय जीवनात आशेचा किरण
By admin | Published: October 30, 2016 02:35 AM2016-10-30T02:35:06+5:302016-10-30T02:35:06+5:30
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी
- प्रज्ञा म्हात्रे
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी म्हणजे काय, हे माहीत नव्हते. अशा मुलांच्या जीवनात बिलिंडा परेरा आशेचा किरण घेऊन आल्या आणि त्यांचे जीवन उजळून गेले...
घरी अठरा विश्वे दारिद्रय असल्यामुळे दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना ही मुले पाहायची. कोण पैसे देते का, कोण खायला देते का, या आशेने ही मुले रस्त्यांवर भटकत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले घराबाहेर पडत. रस्त्यावर कुणी फटाके फोडले की, ते गोळा करत. आपल्याला इतरांप्रमाणे दिवाळी साजरी करता येत नाही, हे पाहून ढसढसा रडत. अंधकारमय जीवन जगणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात २००७ मध्ये आशेचा किरण आला. प्रकाशवाट दाखवणारी होती बिलिंडा परेरा. त्यांनी या मुलांची जबाबदारी घेतली.
शिक्षणाबरोबर त्यांच्या आयुष्यात प्रत्येक सण, उत्सव आणला. यापूर्वी दुसऱ्यांची दिवाळी पाहणारी ही मुले बिलिंडा यांच्यासमवेत १० वर्षे दिवाळी
आनंद, उत्साहाने साजरी करत आहेत. या आनंदापासून आम्ही कोसो दूर होतो. आता मात्र इतरांप्रमाणे आम्हीही दिवाळी साजरी करतो, अशी भावना या मुलांनी व्यक्त केली. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
बिलिंडा या एकदा चहा पित असताना दोन मुले त्यांच्याकडे पैसे मागायला आली. त्या वेळी त्यांनी मी तुम्हाला पैसे नाही तर चहा-बिस्कीट देईन, असे सांगितल्यावर, चालेल आम्हाला असे ती आनंदाने म्हणाली आणि रोज ही मुले त्यांच्याकडे येऊ लागली. तुम्ही माझ्याकडे शिकणार का, असे विचारल्यावर या मुलांनी होकार दिला. २००७ मध्ये उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेवर त्यांनी आपली ‘करुणाघर’ या नावाने शाळा सुरू केली. सुरुवातीच्या काळात बिलिंडा यांनी त्यांना गणित शिकवण्यास सुरुवात केली. स्वत:कडेच वही, पुस्तक नसल्याने माचीसच्या काड्यांच्या मदतीने
ते हा विषय शिकवत. बिलिंडा या खाऊ देत असल्याने या दोन मुलांच्या ओळखीने हळूहळू त्यांच्या ओळखीची मुलेही शाळेत येऊ लागली आणि दोन मुलांपासून सुरू झालेली ही शाळा २२ मुलांची झाली. या मुलांना साक्षर करून बिलिंडा यांनी त्यांना शाळेत दाखल केले. सुरुवातीला बिलिंडा यांना या मुलांच्या पालकांनी तीव्र विरोध केला. परंतु, त्यांचीही समजूत काढत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
२०१५ पर्यंत त्यांची शाळा उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेत सुरू होती. परंतु, आता तिथे काम सुरू झाल्याने या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली. बिलिंडा आणि त्यांची ही मुले एका स्पर्धेत जिंकली होती. त्यातून त्यांना जे पैसे पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले, त्यातून ही जागा घेतली. नववी, दहावी इयत्तांत शिकणाऱ्या या मुलांना त्यांनी शिकवणीही लावली. लक्ष्मी मोर्या या चिमुकलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले.
‘करुणाघर’मध्ये येण्याआधी मी इकडेतिकडे भटकत असे. दिवाळीला कधी वडिलांकडे पैसे मागितले तर ते द्यायचे नाही. उलट, ओरडायचे. मग, मी हताश होऊन दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना पाहत बसायचो. आता मात्र दिवाळीत आम्हाला सर्वच मिळते. आज आम्हाला काहीही कमी पडत नाही.
- सोनू यादव, विद्यार्थी
आता आम्ही दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो.
- रोशनी भोये,
विद्यार्थिनी
आमचे सहा जणांचे कुटुंब. आई सतत आजारी. वडिलांवर सर्व घराची जबाबदारी. घरात पैशांची चणचण असल्याने दिवाळी सणच माहीत नव्हता. इतरांना पाहून मला पण नवीन कपडे मिळावे, असे वाटायचे. ‘करुणाघर’मध्ये आल्यावर आता भरभरून मिळते.
- सुप्रिया वाळंज, विद्यार्थिनी