रिक्षाप्रवास दोन रूपये स्वस्त
By admin | Published: October 7, 2016 05:14 AM2016-10-07T05:14:38+5:302016-10-07T05:14:38+5:30
कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला
अनिकेत घमंडी / डोंबिवली
कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला आहे. त्यामुळे या रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कल्याण आरटीओने घेतला आहे. तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच ३५ लाख प्रवाशांचा रोजचा प्रवास स्वस्त होईल.
हकीम समितीच्या निकषांचा आधार घेत हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाणे शहरात ज्या प्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी १८ रुपये भाडे आकारले जाते, त्याच पद्धतीने या शहरातही आकारले जाईल. सध्या या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येते.
भाड्याचे नवे सूत्र
पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना इंधन स्वस्त पडते. अनकेदा इंधनांच्या वाढीमुळे भाडे वाढवले जाते. आता सीएनजी सुविधेमुळे भाडेही कमी करावे आणि सीएनजीच्या खर्चानुसार भाड्याची नवी रचना ठरवावी, असे आरटीओचे म्हणणे आहे.
एमएमआरटीए घेणार निर्णय
च्कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या या सर्व शहरांत २० हजार रिक्षा आहेत. त्यातील सुमारे १८ हजार रिक्षा सीएनजीवर चालतात. तर ५०० रिक्षा एलपीजीवर चालतात. हकीम समितीच्या निकषांनुसार ६० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर चालत असतील, तर सीएनजीच्या दराच्या सूत्रानुसार भाडे आकारावे लागते. त्याची अंमलबजावणी ठाण्यात होते.
च्ती कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली-कल्याण, टिटवाळा ते बदलापूरपर्यंतच्या सर्व शहरांमध्येही होण्याची गरज आहे. तशी ती व्हावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरटीओने सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
च्याबाबत निर्णय घेण्यासाठी ५ आॅक्टोबरला एमएमआरटीएची बैठक होणार होती. तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील बैठकीत हा निर्णय होईल.
शेअर भाड्यातही कपात
च्शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षाचालकांनाही सध्याच्या भाड्यात कपात करावी लागेल. ते भाडेही साधारण दोन रूपयांनी कमी होईल. शेअर रिक्षांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा निश्चितच फायदा होईल.
च्डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी शेअर पद्धतीने जाण्यासाठी किमान १० रुपये, तर अन्य ठिकाणी १२ रूपयांपासून २० रूपये आकारले जातात. मात्र या शेअर भाड्यावर कुणाचाही अंकूश नाही.
पुन्हा मीटरसक्ती
1या सर्व शहरांमध्ये सुमारे ७५ रिक्षा स्टँड असून डोंबिवलीत २८, तेवढेच कल्याणमध्ये, बदलापूर ६, अंबरनाथ ६ अशा प्रमाणात अधिकृत स्टँड आहेत.
2ठाण्याप्रमाणेच रिक्षा चालकांना शिस्त लागावी, यासाठी या शहरांमध्येही मीटरची सक्ती करण्यात येणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठीही संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले आहे. मीटरसक्ती झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना हाईल. अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यावर मर्यादा येईल.