‘त्या’ निलंबित कामगारांची झाली पुनर्नियुक्ती : जैववैद्यकीय कचरा न उचलण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 09:08 PM2018-04-11T21:08:49+5:302018-04-11T21:08:49+5:30
जैववैद्यकीय कचरा न उचलण्याच्या कारणावरून निलंबित केलेले वाहनचालक रवींद्र खेतावत, सफाईसेवक सुरेश बोडेकर आणि दिलीप सोनावळे या तिघांनाही पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय संबंधित ठेकेदाराने बुधवारी घेतला.
ठाणे : ठाण्यातील एका खासगी रुग्णालयाचा जैववैद्यकीय कचरा न उचलण्याच्या कारणावरून निलंबित केलेले वाहनचालक रवींद्र खेतावत, सफाईसेवक सुरेश बोडेकर आणि दिलीप सोनावळे या तिघांनाही पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय संबंधित ठेकेदार, पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बुधवारी घेण्यात आला. यापुढे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जैववैद्यकीय कचरा न उचलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.
ठाण्याच्या नौपाड्यातील ‘रिवायवल हॉस्पिटल’चा कचरा ७ एप्रिल २०१८ रोजी रवींद्र खेतावत यांच्यासह वरील तिघांनीही सकाळच्या सत्रामध्ये घंटागाडीमध्ये घेतला नाही. जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत घेता येत नसल्याचे त्यांनी रुग्णालयीन कर्मचा-यांना सांगितले होते. त्याच ठिकाणचा इतर कचरा मात्र त्यांनी उचलला होता. रुग्णालयाचा कचरा न घेतल्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून संबंधित ठेकेदाराने या तिघांनाही तडकाफडकी निलंबित केले. ८ एप्रिलपासून त्यांना नोकरीवर येण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट कायद्याचे पालन करण्याचा आग्रह धरणा-या या तिन्ही घंटागाडी कामगारांना त्वरित कामावर घेण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी पालिका प्रशासनासह या ठेकेदाराकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २००० मध्ये सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट नियमावली तयार केली आहे. घनकचरा व्यवस्थापन तसेच बायो मेडिकल वेस्ट (हॉस्पिटलमध्ये तयार होणारा कचरा) निर्मूलनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखलेली आहेत. त्यानुसार हा जैववैद्यकीय कचरा घंटागाडी किंवा इतरत्र टाकल्यास फौजदारी गुन्हाही दाखल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. या कार्यवाहीची नैतिक जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. तो धाब्यावर बसवणा-या हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कायद्याचे पालन करणा-या तिन्ही कामगारांना त्वरित कामावर घ्यावे, अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनने केली होती.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयात राव यांच्यासह संबंधित ठेकेदार, उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर यांच्यात बैठक झाली. त्याच बैठकीमध्ये या तिघांनाही पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे जैववैद्यकीय कचरा घंटागाडी नव्हे, तर पालिकेनेच नियुक्त केलेल्या ‘इनव्हायरो व्हीजिल’ या संस्थेमार्फत उचलण्यात येईल, असेही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ या ठेकेदाराकडील कर्मचा-याने ‘त्या’ कच-यासाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्याला निलंबित केले होते. जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी ‘इनव्हायरो व्हीजिल’ ही संस्था पालिकेने यापूर्वीच नियुक्त केली आहे. हा कचरा कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस नष्ट केला जातो.’’
अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका
‘‘जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी ‘इनव्हायरो व्हीजिल’ या संस्थेची अवघी एकच गाडी संपूर्ण ठाणे शहरातून फिरते. याच गाडीतून ठाण्यातील सर्व रुग्णालयांचा कचरा उचलण्यात येतो. त्याचे शुल्कही जादा असल्यामुळे बऱ्याचदा रुगणालयांकडून हा कचरा घंटागाडी किंवा अन्यत्र फेकला जातो. त्यामुळे यावरही कडक कारवाई झाली पाहिजे.’’
रवी राव, कार्याध्यक्ष, म्युनिसिपल लेबर युनियन, ठाणे