एमआयडीसी निवासी भागात पुन्हा प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:57+5:302021-07-08T04:26:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी निवासी परिसरातील मिलाप नगर, सुदामा नगर, सुदर्शन नगरमध्ये काही दिवसांपासून प्रदूषण वाढले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी निवासी परिसरातील मिलाप नगर, सुदामा नगर, सुदर्शन नगरमध्ये काही दिवसांपासून प्रदूषण वाढले. रात्री ते सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे उग्र दर्प जाणवत असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. काही रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबद्दल येथील रहिवाशांनी समाज माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एमआयडीसीतील रहिवाशांना मंगळवारी रात्री १० वाजल्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत प्रदूषणाचा फटका बसला आहे. याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाकडे ई-मेल, एसएमएस, फोनद्वारे तक्रारी दाखल केल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांनी याबद्दल मिलाप नगरमधील ज्येष्ठ नागरिक नितीन आठल्ये यांना फोन करून त्यांनी केलेल्या तक्रारीबद्दल चौकशी केली. त्यानंतर भोसले व कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी आठल्ये यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. यावेळी जागरूक नागरिक राजू नलावडे हेही उपस्थित होते. त्यानंतर एमआयडीसी परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करू, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
-----------------