लोकवस्तीमधील कलाकारांनी मानवी समस्यांना उत्कटतेने फोडली वाचा, वंचितांचा रंगमंचच्या ६ व्या पर्वाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 04:57 PM2019-06-09T16:57:53+5:302019-06-09T17:03:22+5:30
नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाचा समारोप रविवारी विविध विषयांवरील नाटिका सादरीकरणाने झाला.
ठाणे : नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वात ठाण्याच्या लोकवस्तीमधील कलाकारांनी मनोविकास या विषयावरील नाटिकांमधून, लहान मुलांपासून ते ६० -७० वर्षापर्यंतच्या कलाकारांनी मानवी समस्यांना उत्कटतेने वाचा फोडली. समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाट्य आयोजित नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाचा समारोप रविवारी साने गुरुजी स्मृतीदिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे नाट्यजल्लोष अर्थात वंचितांचा रंगमंचच्या ६ व्या पर्वाचा समारोप ६ नाटिकांच्या सादरीकरणाने झाला.
वंचितांचा रंगमंच ही चळवळ राज्यातील अन्य जिल्ह्यात मनोविकास थीम वर आधारित असलेल्या ५- ६ उत्तम नाटिकांचे प्रयोग करण्याचा मानस असल्याची माहिती सुप्रसिद्ध मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रविवारी दिली. या कार्यक्रमासाठी डॉ .आनंद नाडकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते, वंचितांच्या रंगमंचाच्या मनोविकास थीमशी निगडित असलेल्या सहा नाटिका राज्यातील अन्य भागात नेल्यास रंगभूमी चळवळीला नवीन आयाम उपलब्ध होतील . असा विश्वास डॉ . नाडकर्णी यांनी व्यक्त केला. मनोरमानगर गटाने गेम आणि मन एक मंदिर या दोन नाटिकांमधून प्राप्त परिस्थितीशी झगडत आनंदी जीवन कसं जगावं याचा कवडसाच उलगडला. टी.व्ही. मालिका, मोबाईल यामुळे लहानग्यांच्या मनावर होणारे दुष्परिणाम, घरातील संवाद संपणे, पालकांचे दुर्लक्ष यामुळे मुलांच्या मनाचा होणारा कोंडमारा हे सिद्धेश्वर तलाव च्या आम्हाला ही नाटक करायचं आहे या नाटिकेतून मांडण्यात आले. हर्षदा बोरकर लिखित या नाटकातून माणसांच्या होण्याऱ्या चुका यातून सावरत मनावर येणारा ताण नाटकातून खोट-खोट हसायचं. खोट रडायचं, थोडं थोडं शिकायचं हे संस्कारक्षम वयावर भाष्य करणारी आणि लहान मुलांचे जीवन उलगडणारी ही नाटके खुप काही व्यक्त करून गेली. माणसांच्या व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार चेतन दिवे या उदयोन्मुख कलाकार, दिग्दर्शित संशय आणि नॉस्टेलजिया या दोन नाटिकांनी वेगळ्याच दिमाखात, व्यावसायिक रंगभूमीच्या तोडीच्या सादरीकरणाची झलक दाखवली.
कॉर्पोरेट जगात स्त्रियांच्या मनाची अवस्था, धावपळ, जबाबदाऱ्या, घरातील लोकांचा, नवऱ्याचा पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि यावर संवेदनशीलतेने आणि शास्त्रीय पद्धतीने मनोविकासातून मार्ग निघू शकतो हे फार प्रभावीपणे सांगुन गेली. कसदार अभिनयातून 'फुगे' हि नाटिका विश्वनाथ चांदोरकर दिग्दर्शित किसननगर गटाच्या वतीने शरीरविज्ञान, सामाजिक,सांस्कृतिक, भावनिक जीवन शिक्षण देणारी शिक्षण पद्धती कशी योग्य ठरू शकेल हे पटवून देणारी ठरली. या वेळी समता विचार प्रसारक संस्थेचे संजय मंगल गोपाळ , लतिका सुमो , जगदीश खैरालिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन हर्षदा बोरकर यांनी केले .