मनसेने वाचला तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:27 AM2019-11-19T00:27:44+5:302019-11-19T00:27:54+5:30
आयुक्तांचे शिष्टमंडळाला केवळ तोंडी आश्वासन
मीरा रोड : शहरातील वाढती बेकायदा बांधकामे, मेट्रोच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेली पामची सुमारे ६५० झाडे तोडण्याची भीती, नवघर आरोग्य केंद्राचे न झालेले उद्घाटन, शहरातील खड्डे, फेरीवाले, तक्रारींना न दिली जाणारी उत्तरे अशा विविध विषयांवर मनसेच्या शिष्टमंडळाने मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी केवळ तक्रारी दूर करण्याचे तोंडी आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मीरा-भार्इंदर मनसेचे शहर संघटक हेमंत सावंत आणि दिनेश कनावजे, शशी मेंडन, रमाकांत माळी, चंद्रशेखर गजरे, विशाल चव्हाण, मनोज कोतवाल, कविता वायंगणकर, वैशाली येरु णकर, कुमकुम पाटण, गुणाजी मिस्त्री, दत्ता परब, सचिन मोरे, विनोद चव्हाण, धीरज पाटील, अरविंद जैन, योगेश साळवे आदी पदाधिकारी नुकतेच आयुक्त बालाजी खतगावकर यांना भेटले. शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांसह प्रभाग समिती ६ मध्ये सर्वात जास्त बांधकामे होत असल्याचा सूर मनसेने लावला. यासंबंधात सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक याबाबत बोलावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आयुक्तांनी रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवू तसेच अन्य फेरीवाल्यांसाठी मार्केट बांधत असून ते झाल्यानंतर स्थलांतर करण्यात येईल, असे सांगितले. शहरातील खड्डे दोन दिवसांत बुजवले जातील. नवघर आरोग्य केंद्र १० दिवसांत सुरू करू, असेही आयुक्त खतगावकर म्हणाले.
आयुक्तांना आम्ही लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. लेखी उत्तरही आयुक्त देणार आहेत. कार्यवाही नाही केली तर आठ दिवसांनी आम्ही पुन्हा आयुक्तांना भेटणार असून वेळ पडल्यास आंदोलन करू, असे हेमंत सावंत म्हणाले.
झाडे तोडण्यास विरोध
मेट्रोच्या कामामुळे काशिमीरानाका ते सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) पर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गातील दुभाजकांमध्ये असलेली पाम आदी साडेसहाशे झाडे तोडण्यास मनसेने विरोध केला. त्यावर आयुक्तांनी ही झाडे आवश्यकतेनुसार दुसरे उद्यान, रस्ते येथे लावली जातील, असे आश्वासन दिले.