भाजपाविरोधात सेनेची महायुती, शेतक-यांतील असंतोषाला फोडणार वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:53 AM2017-09-14T05:53:49+5:302017-09-14T05:54:02+5:30
भिवंडी महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना शह देत काँग्रेसला बळ देणा-या शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपाविरोधात महायुती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
भिवंडी : भिवंडी महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना शह देत काँग्रेसला बळ देणा-या शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपाविरोधात महायुती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपावासी झालेले खासदार कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेत भाजपाला एकटे पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे आणि कर्जमाफी देण्यात अपयश झाल्याने शेतकºयांत असलेल्या असंतोषावर भर देत भाजपाविरोधक ही निवडणूक लढविणार असून त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, कुणबी सेना तसेच श्रमजीवी संघटनेच्या नेत्यांची भिवंडीत गुप्त बैठक झाली आणि त्यात ग्रामीण राजकारणातही भाजपाला एकटे पाडण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाचा पाडाव व्हावा यासाठी प्रयत्न करणाºया अन्य पक्षांनाही यात सामावून घेण्याचे यावेळी ठरले.
खासदार पाटील यांनी महायुतीसाठी आवाहन करत शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू करताच आक्रमक होत शिवसेनेने भाजपासोबत कोठेही युती नाही, या आपल्या निर्णयाचा पुनरूच्चार केला. त्यातही तालुकाप्रमुख विश्वास थळे यांचा राजीनामा नामंजूर करण्याची मागणी लावून धरण्यात आली. थळे यांच्या राजीनाम्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांकडे धाव घेतली आणि थळे यांनाच पदावर कायम ठेवण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी थळे यांचा राजीनामा नामंजूर करत त्यांना शिवसेनेच्या कामात सक्रीय रहाण्यास सांगितल्याने पक्षाला अनुभवी नेता मिळाला आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत जसा प्रभाग रचनेचा मतदारयाद्यांचा वाद होता, त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या गट व गणाचे क्षेत्र नैसर्गिंक सीमांप्रमाणे नसल्याचा आरोप करत अनेकांनी तहसीलदारांकडे हरकती दाखल केल्या. पण त्यावर निर्णय न घेताच निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले.
विरोध भाजपाला नव्हे!
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अशीच महायुती झाली होती. तिच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम ठेवली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश (बाळा)म्हात्रे यांनी दिली.आमचा भाजपाला विरोध नाही. पण खासदार कपिल पाटील यांच्या कार्यपध्दतीला आक्षेप आहे. अन्य पक्षांना खिंडार पाडण्याच्या तयारीत असलेल्या पाटील यांच्याविरोधात ही लढाई असेल, हे त्यांनी सूचित केले.
पक्षांतराला वेग
आपापल्या गट-गणाचा विचार करून ग्रामीण भागात सध्या इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणाप्रमाणे वर्चस्व असलेल्या मतदारांनुसार तिकीटाच्या अपेक्षेने पक्षांतराला वेग आला आहे.
काँग्रेससह अन्य पक्ष सोबत
भिवंडी महानगरपालिकेत शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्तेत आहे. या निवडणुकीनिमित्ताने शिवसेनापुरस्कृत महायुतीचा पॅटर्न राबवत ग्रामीण भागातही भाजपाला एकटे पाडण्याचे तंत्र शिवसेनेने अवलंबले आहे. राष्ट्रवादीतून फुटून भाजपात आलेल्या पाटील यांची भिस्त सोबत आलेल्या कार्यकर्त्यांवर आहे. आधीपासून भाजपात असलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली नाही. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पाटील यांना स्वतंत्रपणे हा किल्ला लढवावा लागणार आहे.
शेतक-यांच्या नाराजीवर लक्ष
कर्जमाफी न झाल्याने शेतकºयांत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा भाजपा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शेतक-यांवर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या नाराजीला योग्य दिशा देता आली, तर भाजपाला सहज धक्का देता येऊ शकतो, हे गृहीत धरून सर्व हालचाली सुरू आहेत.
खर्चासाठी भाजपाकडे ओढा
महापालिका निवडणुकीत भाजपाने उमेदवारांना पक्षातर्फे निवडणूक खर्चासाठी घसघशीत रकमा दिल्या होत्या. तशीच मदत यावेळीही मिळण्याची शक्यता असल्याने आपल्याला खर्च करावा लागणार नाही, या अपेक्षने भाजपाकडे ओढा असल्याचे राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितले.