ठाण्यातील वाचक कट्ट्यावर भरली 'शाळा वाचक कट्ट्याची', कविता व धड्यांचे सादर झाले अभिवाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:29 PM2019-03-16T16:29:14+5:302019-03-16T16:36:15+5:30
ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'शाळा वाचक कट्ट्याची' भरली होती.
ठाणे : वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि टेक्नॉलॉजिकडे अवास्तव ओढल्या जाणाऱ्या नवीन पिढीला वाचनाचं महत्व कळावं त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्याच संकल्पनेतून निर्माण झालेल्या 'शाळा वाचक कट्ट्याची' ह्या सदरातील दुसरे पुष्प वाचक कट्टा क्रमांक ४० वर सादर झाले. सदर वाचक कट्ट्याची सुरुवात ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी दशरथ कदम ह्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता व धड्यांचे अभिवाचन सादर केले.
चिन्मय मौर्य ह्याने 'नदीचे गाणे', 'पतंग', 'गमतीदार पत्र' ; वैष्णवी चेऊलकर हिने 'झोका', 'सारे कसे छान' ; पूर्वा तटकरे हिने 'आकाशातील चंद्र', 'कौमुदीचा चौकोन', 'माझा महाराष्ट्र' ; स्वरांगी मोरे हिने 'प्रश्न', 'टेबल आणि खुर्ची', 'आमचे चुकले' ; प्रथम नाईक ह्याने 'जीवन गाणे', 'आभाळाची आम्ही लेकरे', 'घाटात घाट वरंधघाट' ; रोहित कोळी ह्याने 'शब्दांचे घर' , 'टप टप पडती अंगावरती', 'वाचनाचे वेड' ; श्रेयस साळुंखे ह्याने 'थेंब आज हा पाण्याचा', 'अनाम वीरा', 'धोंडा' ह्या संहितांचे वाचन केले. अद्वैत मापगावकर ह्याने 'गरा गरा भिंगऱ्या', 'संगणक मी' सोबत 'सगळ्या भाज्या खाणार' ह्या कवितेतून भाज्यांचे महत्व पटवून दिले तर अमोघ डाके ह्याने 'पाऊस', 'झोपाळा गेला उडून' सोबत वेशभूषा करून सादर केलेला 'लोठे बाबा' धम्माल उडवून दिली. सई कदम हिने सादर केलेल्या 'सही' ह्या कवितेतून शिक्षकांच्या सहीच आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील ऋणांनुबंध श्रोत्यांना अनुभवयास मिळाला.
बालकलाकारांसोबतच परेश दळवी ह्याने शाळेतील आठवणींना उजाळा देणारा बालभारती पाठपुस्तकातील दादासाहेब मोरे लिखित 'कसरत' ह्या धड्याचे अभिवाचन केले. सुरेश राजे ह्यांनी देखील विविध अंगाईगीत आणि कविता सुरेल चालींमध्ये सादर केल्या. मराठी भाषेचं हरवत चाललेलं अस्तित्व टिकवण ही काळाची गरज आहे.तिचा इतिहास जाणणे, तिच्यावरील पकड, तिची शुद्धता, तिचा गोडवा जपणं हे आपलंच कर्तव्य आहे. बालकलाकारांमध्ये ह्या वयातच वाचनाचं बीज रुजाव म्हणूनच शाळा वाचक कट्ट्याची हे सदर बालकलाकारांसाठी वाचक कट्ट्यावर सुरू करण्यात आलं आहे.सदर उपक्रम मुलांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल असे मत अभिनय कट्टा आणि वाचक कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सदर वाचक कट्ट्याचे निवेदन अभिनय कट्ट्याची बालकलाकार सई कदम हिने केले.