साठेनगरात मुलांमध्ये रुजणार वाचन संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:32 AM2020-10-08T01:32:56+5:302020-10-08T01:33:00+5:30
अनुबंधतर्फे ‘वाचनालय आपल्या दारी’; विविध प्रकारची ११० पुस्तके उपलब्ध
कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर असलेल्या साठेनगर या लोकवस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनुबंध ही संस्था करत आहे. आता या संस्थेने तेथील मुलांच्या शिक्षणासाठी ‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे.
सध्या अनलॉक झाले असले, तरी शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, गरीब कुटुंबांतील मुलांकडे टॅब, लॅपटॉप, स्मार्ट फोन नाहीत. केडीएमसी शाळेत शिकणारे ४० टक्के विद्यार्थी हे शिक्षणासाठी साधन नसल्याने आॅफलाइन आहेत. त्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती साठेनगरातील नाही. तेथील नागरिक हे डम्पिंगवरील कचरा उचलून त्याचे वर्गीकरण करण्याच्या कामावर उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनुबंध करत आहे. आता या संस्थेने तेथील मुलांसाठी ‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.
उंबर्डे येथील बीएसयूपी प्रकल्पातील इमारतीत दरशनिवारी हा उपक्रम राबवला जात आहे. त्या मराठीतील बोधकथा, इसापनीती आदी ११० पुस्तके या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या उंबर्डे येथे सुरू असलेला हा उपक्रम पुढील कालावधीत पाणबुडेनगरातील वस्तीवरच्या मुलांसाठी सुरू केला जाणार आहे, अशी माहिती अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी दिली आहे.
साने गुरुजी, संत कबीर यांच्या पुस्तकांना मागणी
उंबर्डे येथील उपक्रमाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साने गुरुजी, संत कबीर यांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी संस्थेकडे केली आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.