ठाण्यात लढायला तयार, आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच बालेकिल्यात दिले आव्हान
By अजित मांडके | Published: April 5, 2023 07:42 PM2023-04-05T19:42:00+5:302023-04-05T19:44:17+5:30
ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
ठाणे : ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यापूर्वी या बालेकिल्याला मानत होते. परंतु आता ते मानत नाही. त्यामुळे याच ठाण्यात मी या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या रोषणी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर शक्तीस्थळावर झालेल्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असतांना मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नसल्याचे आर्श्चय वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चा काढतांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी आल्याचे सांगत टीकेची झोड उठविली.
मिंदेच्या लोकांनी, चिंदीचोरींनी एका महिलेला मारहाण केली. मात्र तिची तक्रार घेतली नाही उलट तिच्याविरोधातच गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय असा सवालही त्यांनी केला. तक्रार करण्यासाठी गेलो असता, पोलीस आयुक्तही पळून जातात, पण याबद्दल कोणाला काय बोलणार कारण ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यामुळे हा चोरांचाच पक्ष असू शकतो नाही तर चोरांची टोळीच असे कृत्य करु शकते असेही ते म्हणाले. राज्यात एवढे प्रश्न असतांना शेतकरी आत्महत्या होत असताना, येथील उद्योग गुजरातला जात असतांना, महिलांवरील अत्याचार वाढले असतांना राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे ते राज्याचे नाही तर गुजरात आणि गुहाटीचे मुख्यमंत्री असल्याचेही टिका त्यांनी केली. त्यातही महाराष्टÑाला मुख्यमंत्री लाभाला नसून गुजरातला दोन मुख्यमंत्री लाभल्याने त्यांचे अभिनंदन करतो अशी टीका त्यांनी केली.
शपथ इथे घेतली आणि नंतर पळून गेलेले आहेत, अशी देखील टिका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. सुप्रिया सुळे विषयी बोलले जाते, सुष्मा अंधारे यांच्या विषयी बोलले जाते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही, इथे मार खाण्यावर कारवाई होते, असे हे सरकार आहे. महिलांवर अत्याचार होत असतांना जे अत्याचार करीत आहेत, त्यांच्यावर कौतुकाची थाप मुख्यमंत्री मारत आहेत. दहीसरमधून एक गद्दार भाजपमध्ये गेला, त्याला वाटले आपण आता सुटलो. मात्र याच गद्दार गँगने त्यांना मारहाण केली. मात्र त्याच्या बाजूने कोणीच बोलायला तयार होत नाही, त्याबाबत आम्ही बोललो तेव्हा भाजपवाले कुठे गेले होते. असा सवालही त्यांनी केला. गुंडाची संख्या वाढत आहे, त्यांना पाठबळ दिले जात आहे, यातून फडणवसींचा नाव खराब होत आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुकवरुन सरकार चालविले असे बोलले जाते. मात्र त्यांनी केलेल्या कामामुळेच आज त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून बोलले जाते. अन्यथा आपल्या राज्याची परिस्थिती सुरत, अहमदाबाद सारखी झाली असती असा टोला लगावतांना सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच पध्दतीन एकदा फेसबुक लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी देशाचा पंतप्रधानच राष्टÑपतींना करुन टाकले होते. अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
तुम्हाला काय करायचे ते करा, किती गुन्हे दाखल करायचे ते करा मात्र पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे विसरु नका आणि जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना जेलभरो यात्री घडवली नाही तर बघा असा इशारा देखील दिला.
आम्ही आता ही वज्रमुठ केली आहे, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ देणार का? अशी साद त्यांनी ठाणेकरांना घातली आणि त्याला ठाणेकरांनी होकर दिला. तसेच राज्यात आता राणी सन्मान यात्री काढली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आमचे सरकार आल्यानंतर छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
राज्यात घोटाळे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आता सरकारला चले जाव करायची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. हमारा नाम मिटाने चले हो माझे नाव आदीत्य रश्मी उध्दव ठाकरे आहे, त्यामुळे सामने आओ हम तुम्हारा नाम भुला देंगे असा इशाराही त्यांनी दिला.