वारकऱ्यांवरील वार झेलायला तयार; एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:24 IST2025-04-06T09:24:04+5:302025-04-06T09:24:17+5:30
उत्सवासाठी देहू, आळंदीहून आलेले ३५० हून अधिक कीर्तनकार, वारकरी शुक्रवारी सहभागी झाले होते.

वारकऱ्यांवरील वार झेलायला तयार; एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात वक्तव्य
ठाणे : देश घडवणारा वारकरी संप्रदाय आहे. या वारकऱ्यांवर जर कोणी वार करत असेल तर तो वार झेलायला हा एकनाथ शिंदे पुढे असेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ठाण्यात केले.
ठाणे पूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे मातेचा चैत्र नवरात्रौत्सव सात एप्रिलपर्यंत सुरू आहे. या उत्सवासाठी देहू, आळंदीहून आलेले ३५० हून अधिक कीर्तनकार, वारकरी शुक्रवारी सहभागी झाले होते.
त्यावेळी शिंदे म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असतो. त्यामुळे समाजाला यांची गरज आहे. अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत वारकऱ्यांनी ठरवले आणि करेक्ट कार्यक्रम करून टाकला. ज्याच्या पाठीशी वारकरी तो यशाचे शिखरे पार करतो. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर मी एक वारकरी म्हणून उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजासाठी काय केले हे सांगणार नाही, तर यापुढे जे जे काही करायचे ते करीतच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माझा कष्टकरी वारकरी भयमुक्त झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा केव्हाही हाक माराल तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी धावून येईल, असेही ते म्हणाले.
महायुती सरकारने अडीच वर्षात काय काम केले त्याचे साक्षीदार आपण आहात. असे सांगताना निर्णय कागदावर नाही ठेवले तर त्याची अंमलबजावणी केली. सत्ता येते जाते, पदे येतात-जातात, बाळासाहेब सांगायचे नाव गेले तर ते परत येणार याची आठवण त्यांनी करून दिली.