बंडखोर नगरसेवकांची आज सुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:01 AM2021-01-05T01:01:43+5:302021-01-05T01:01:50+5:30

महापौर निवडणुकीतील फाटाफूट : राष्ट्रवादीमुळे अभय मिळणार?

Rebel corporator hearing today | बंडखोर नगरसेवकांची आज सुनावणी 

बंडखोर नगरसेवकांची आज सुनावणी 

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडीत काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार पराभूत केल्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून आपल्यावर कारवाई होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांविरुद्धच्या अर्जाची मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यापुढे सुनावणी होत आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसमध्ये यामुळे ठिणगी पडण्याची शक्यता आहे. परिणामी, साऱ्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषीका रांका यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या १८ फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी महापौर जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. कोकण आयुक्तांनी सुनावणीसाठी बंडखोर नगरसेवकांना बोलावले होते, त्यावेळी १८ पैकी फक्त पाच नगरसेवक हजर होते. विभागीय आयुक्त मिसाळ यांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. कागदपत्रे तपासणीस वेळ हवा असल्याची मागणी नगरसेवकांच्या वकिलांनी केल्यामुळे आयुक्तांनी ५ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोकण आयुक्तांकडे जबाब करणार सादर
सर्व १८ नगरसेवक मंगळवारी कोकण आयुक्तांच्या कार्यालयात आपला जबाब व माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर या नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. कारवाईच्या बडग्यातून सुटका व्हावी, याकरिता या १८ नगरसेवकांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश काँग्रेस वरिष्ठांच्या जिव्हारी लागला असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे कमालीचे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या नगरसेवकांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rebel corporator hearing today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.