भाजपाविरोधात संघाचे बंड !
By Admin | Published: May 2, 2017 02:50 AM2017-05-02T02:50:36+5:302017-05-02T02:50:36+5:30
भारतीय जनता पक्षाची भिवंडीतील राजकीय ताकद फार नसली, तरी गेल्या काही वर्षांत अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी
भिवंडी : भारतीय जनता पक्षाची भिवंडीतील राजकीय ताकद फार नसली, तरी गेल्या काही वर्षांत अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा ताबा घेतला असून निवडणुकीतही निष्ठावंतांना डावलून बाहेरून येणाऱ्यांना पायघड्या घातल्या जात असल्याने पक्षातील असंतोष उफाळून आला आहे. त्यातच कोणार्क आघाडीशी समझोता करण्याच्या निर्णयाची ठिणगी पडली असून अर्र्ज भरण्यास अवघे पाच दिवस उरले असताना संघ परिवारानेही बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे इतर पक्ष फोडण्याच्या पावित्र्यात असलेल्या भाजपालाच फुटीचे ग्रहण लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
भाजपा आणि कोणार्क आघाडीतील समझोत्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच भिवंडीच्या राजकीय वर्तुळातील हालचालींनी अचानक वेग घेतला. कोणार्कच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत फारसे भाष्य केले नसले, तरी त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचवेळी भाजपातील बंडाळी मात्र उफाळून आली आहे.
गेल्या काही वर्षांत भाजपात नव्याने आलेल्यांनी आपल्या समाजातच पदे वाटली, आपल्याच कार्यकर्त्यांची विविध पदांवर वर्णी लावली. आताही उमेदवारी वाटपात इतर नेत्यांनी अन्य पक्षातून फोडून आणलेले नेते किंवा कार्यकर्ते यांच्यापेक्षा प्राबल्य असलेल्या गटाला, त्यांच्या नेते-कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जात असल्याने बंडाला तोंड फुटले आहे. पक्ष काही विशिष्ट व्यक्तींच्या ताब्यात गेल्याचा आरोप निष्ठावंतांनी सुरू केला आहे.
त्यातच भाजपाप्रणित आघाडीचा प्रयत्न फसल्याने आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनेकांनी नकार दिल्याने पक्षाची सध्या दिसणारी वाढ ही खरोखरच वाढ आहे की सूज आहे, असा प्रश्न उघडउघड विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळेच उमेदवारी नाकारली गेलेल्यांनी नेत्यांना थेट जाब विचारण्यास सुरूवात केली आहे.
कोणार्कविरोधात उमेदवार न देण्याच्या पक्षाच्या निर्णयाला आणि भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोणार्कच्या चिन्हावर रिंगणात उरतण्याच्या घेतलेल्या निर्णयालाही पक्षाच्या वेगवेगळ््या नेत्यांनी हरकत घेतली असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करण्यास सुरूवात केली आहे.
भाजपामधील नव्या गटाने महापौरपद आपल्याकडे रहावे यासाठी कंबर कसली असून त्यासाठी वेगवेगळ््या आघाड्या, समझोत्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाले तर सत्ता पुन्हा एका घराण्याभोवती एकवटणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी संघर्ष केला तरी नंतरची पदे आधीपासून भाजपाच्या वाढीसाठी झटणाऱ्यांच्या पदारत पडणार नाहीत. उलट ती नवभाजपावाद्यांच्या हाती जातील, या कल्पनेनेही अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. (प्रतिनिधी)
काम न करण्याचा पवित्रा
भिवंडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेे अन्य प्रदेशांपेक्षा संवेदनशील आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर गांधी हत्येचा आरोप करताच येथील संघ कार्यकर्त्यांनी तो मुद्दा धसास लावत प्रकरण न्यायालयात नेले. अशा जागरूक कार्यकर्त्यांना डावलून पक्षात उपऱ्यांना महत्त्व देण्याविरोधात वातावरण तापू लागले आहे.
त्यामुळे आम्हाला कोणत्याही आघाडीच्या दावणीला बांधू नका, कमळाखेरीज अन्य चिन्हांसाठी काम करायला लावू नका, असे त्यांनी भाजपा नेत्यांना सांगण्यास सुरूवात केली आहे. तसा निर्णय लादला, तर आम्ही कामच करणार नाही किंवा तटस्थ राहू असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पक्षातील अनेकांचे दाबे दणाणले आहे.
कोणार्कविरोधातील नाराजी भोवणार
मागील सत्तेत कोणार्क सहभागी होती. मात्र संघाचे प्राबल्य असलेले जे प्रभाग ते भाजपाकडून मागत आहेत, त्या प्रभागात त्यांनी काम न केल्याबद्दल नाराजी आहे. ती भाजपा आणि संघाने का सोसायची असा त्यांचा प्रश्न आहे. ती नाराजी त्यांना नाही, तर आम्हाला भोवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हा विरोध नव्हे, मतभेद
भाजपात निवडणुकीची धुरा पाहणाऱ्या नेत्यांनी मात्र पक्षात असा टोकाचा विरोध असल्याचे नाकारले. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांत काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात. पण त्याला बंडाचे स्वरूप देणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी मांडले. येत्या चार दिवसांत हा प्रश्न निकाली निघेल आणि निवडून येण्याच्या निकषावर योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल. त्यावर कुणा एका गटाचे वर्चस्व नसेल, अशी सारवासारवही केली.