बरोरांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत बंडाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:03 AM2019-07-11T00:03:37+5:302019-07-11T00:03:40+5:30
चार दशकांची साथ सोडली : पवार समर्थक दुरावल्याने राष्ट्रवादीला घरघर
नारायण शेट्टी/पंडित मसणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर/वासिंद : मुंबईत न रुजलेली राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत पाळेमुळे घट्ट धरून उभी होती. मात्र गेल्या चार दशकांहून अधिक काळ शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या पांडुरंग महादू बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पवार यांच्या साम्राज्याला घरघर लागली आहे. बरोरा यांच्याकरिता भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे पर्याय उपलब्ध होते. मात्र, शिवसेनेने बरोरा यांना पक्षप्रवेश देऊन भाजपवर कुरघोडी केली आहे. बरोरा यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून काही शिवसैनिक बंडाच्या पवित्र्यात आहेत.
पवार यांनी यापूर्वी समाजवादी काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. मात्र, दोन्ही वेळा पवार यांना मुंबईने स्वीकारले नसले, तरी शेजारील ठाणे जिल्ह्यावर पवार यांनी चांगली पकड मिळवली. ठाण्यात वसंत डावखरे, उल्हासनगरात पप्पू कलानी, शहापूरमध्ये एकेकाळी स्व. महादू बरोरा व त्यानंतर आता पांडुरंग बरोरा अशा नेत्यांनी पवार यांची साथसोबत केल्याने पवार यांचा जिल्ह्यावरील वरचष्मा टिकून होता. मात्र, वसंत डावखरे यांच्या निधनानंतर निरंजन यांनी भाजपचा रस्ता धरला. उल्हासनगरात पप्पू कलानी यांची पत्नी ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या आमदार असल्या तरी त्यांचे पुत्र ओमी हे भाजपकडे सरकले आहेत. आता बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पवार यांचे खंदे समर्थक ठाणे जिल्ह्यात त्यांना सोडून जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत होत आहे.
पांडुरंग बरोरा यांचे वडील स्व. महादू बरोरा हे पवारांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय होते. पवारांच्या समाजवादी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बरोरा पितापुत्राने कार्यरत राहून चार वेळा आमदारकी प्राप्त केली. वडिलांच्या पश्चात पुत्र पांडुरंग यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांचा एकदा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत विजय झाला.
मंगळवारी आमदार बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिल्यानंतर बुधवारी सकाळी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला.
शिवसेनेत असंतोष, पालकमंत्र्यांवर नाराजी
बरोरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शहापुरातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला असून लवकरच बंडखोरीची लागण होऊ शकते, असे संकेत प्राप्त होत आहे. बरोरा यांच्यासोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते हे देखील सेनेत दाखल झाले आहेत.
शहापुरात आतापर्यंत राष्ट्रवादीचे बरोरा विरुद्ध शिवसेनेचे दौलत दरोडा यांच्यात संघर्ष राहिला आहे. त्यामुळे बरोरा व शिवसेनेचे तालुका पदाधिकारी यांच्यात पदे, नियुक्त्या यामुळे वाद झाल्यास काही कट्टर शिवसैनिक दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर निष्ठावंत शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले असून, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.
मी कुठल्याच राजकीय पक्षात न जाता शिवसेनेचे काम करीन व मलाच उमेदवारी मिळेल.
- दौलत दरोडा, माजी आमदार, शिवसेना