Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडखोरीमुळे निवडणूक लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:54 AM2019-10-20T01:54:59+5:302019-10-20T05:41:46+5:30
निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष
- मुरलीधर भवार
कल्याण : महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आग्रही राहिल्याने कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. दुसरीकडे भाजपने आपल्या आमदारांकडून केवळ मतदारसंघच हिरावून घेतला नाही, तर त्यांची उमेदवारीही कापली. त्यामुळे ते बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.
कल्याण पश्चिमेतून शिवसेनेने दोनदा निवडणूक लढवली. मात्र, दोन्ही वेळा पदरी पराभव आला. २०१४ मध्ये स्वबळामुळे भाजपचे आमदार नरेंद्र पवार येथून निवडून आले. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत पक्षातील इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीपासूनच हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, दुसरीकडे पवार यांच्याच पक्षातील इच्छुकांनी उमेदवार बदलण्याची केलेली जोरदार मागणी त्यांना मारक ठरली. अखेर, शिवसेनेला जागा सोडल्यावर पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करून बंडखोरी केली. शिवसेना विरुद्ध अपक्ष बंडखोर, असा संघर्ष या मतदारसंघात पेटला आहे.
शिवसेनेने इच्छुकांच्या मागणीनुसार विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार त्यांच्या कामाला लागले. भोईर यांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय संसदीयमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मेळावा घेतला. शिवसेनेच्या स्टार प्रचारक व प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे भोईर यांच्या प्रचारात उतरले होते. पवार यांनी बंडखोरी केल्याने भाजपमधून आमदारकीसाठी इच्छुक असलेले, नगरसेवक व पदाधिकारी हे पक्षाच्या आदेशानुसार भोईर यांच्या प्रचारात आले. मतदारसंघातील आधारवाडी डम्पिंग, वाहतूककोंडीचे प्रश्न पाच वर्षांत सुटलेले नाहीत, या मुद्द्यांवर भोईर यांनी भर दिला आहे.
दुसरीकडे पवार यांनी व्यक्तिगत संपर्काच्या जोरावर प्रचार सुरू केला. पवारांच्या प्रचारात शहीद भगतसिंग यांचे वंशज विक्रमसिंग संधू हे उपस्थित होते. मात्र, पुढील सभा व मेळाव्यात त्यांचा चेहरा दिसला नाही. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पवार मते मागत आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर प्रकाश भोईर हे निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये ते पराभूत झाले होते.
मनसेने पुन्हा प्रकाश भोईर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी वाहतूककोंडी व खड्डे या मुद्यांना हात घालत महापालिका व राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्याचबरोबर २००९ ते २०१४ या पाच वर्षांत भोईर यांनी काय कामे केली, याची यादीच स्वत: ठाकरे यांनी सभेत वाचून दाखविली. शुक्रवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे यांनीही भोईर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली.
त्याचबरोबर या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कांचन कुलकर्णी या देखील रिंगणात आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा तर २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. दरम्यान, यंदाही काँग्रेसच्या नेत्यांनी एकही जाहीर सभा मतदारसंघात घेतलेली नाही.
प्रचारफेऱ्या, रॅलीद्वारे प्रचाराचा धुराळा
रिंगणातील चारही उमेदवारांनी घरोघरी मतदारांच्या तसेच ज्ञाती समाजाच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचारफेºया, रॅलीद्वारे प्रचाराचा धुराळा उडवून दिला. विरोधकांनी मतदारसंघात न झालेला विकास तसेच वाहतूककोंडी, खड्डे, डम्पिंगची समस्या या मुद्द्यांवर प्रचार केला. त्याचप्रमाणे बंडाळीच्या विषयाने हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला. त्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार, याविषयी उत्सुकता कायम आहे.