वाहतूक नियम न मोडता दंडाची पावती येतेय घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:14 AM2019-09-27T00:14:56+5:302019-09-27T00:15:21+5:30
वाहनधारकांनो सावधान; आरटीओंना तक्रार करण्याचे आवाहन
- पंकज रोडेकर
ठाणे : तुम्ही गाडी खरेदी केल्यानंतर तुमच्याकडून वाहतुकीचे सर्व निर्णय काटेकोर पाळले जातात. पण, तरीसुद्धा तुम्हाला ई-चलनाद्वारे वाहतुकीचे नियम मोडल्याची एखादी दंडाची पावती घरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरा सावधान...! अशा दंडाची पावती घरपोच येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही भामट्यांनी ही शक्कल लढवली असून ते बनावट नंबरप्लेटचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. यासंदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रारीचे प्रमाण वाढल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी आरटीओने याबाबत कायदेशीररीत्या तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे, मुंबई आणि इतर शहरांत ई-चलन ही प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवल्यावर पोलीस संबंधित वाहनधारकांच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो काढत आहेत. त्यानुसार, त्याला दंडाची पावती घरपोच पाठवली जाते. या दंडाची रक्कम नियम मोडल्यावर वाढते. या दंडाच्या रकमेची झळ खिशाला बसू नये, यासाठी काही भामट्यांनी बनावट नंबरप्लेट आपल्या गाडीस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यातून दंडाच्या पावतीसोबत आलेल्या फोटोत मूळ नंबरप्लेट असलेल्या मालकाला ती पावती गेल्यावर धक्का बसत आहे. त्यातून मी नियमच मोडला नाही. तरीसुद्धा मला दंडाची पावती आली कशी तसेच नंबरप्लेटवर नंबर आपल्याच गाडीचा आहे. पण, पाठवलेल्या फोटोमधील गाडी आपली नसल्याने ही पावती आलीच कशी, असा प्रश्नही त्यांना पडत आहे. याबाबत ठाणे आरटीओ कार्यालयात काही दिवसांत सात ते आठ जणांनी अर्जाद्वारे तक्रारी दिल्या आहेत. त्यात एका नेव्हीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यानेही वाहतुकीचे नियम न मोडताही त्याच्या घरी दंडाची पावती आल्याने आश्चर्य व्यक्त करून त्याने आरटीओ कार्यालयात धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यातच मूळ गाडीचा नंबर असलेल्या मालकाची आणि गाडीची माहिती आरटीओ विभागाकडून मिळू शकते. तसेच बनावट नंबरप्लेटधारकांचा शोध घेण्याचे काम हे पोलीस यंत्रणेचे आहे. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
मध्यंतरी, उल्हासनगरमध्ये बनावट नंबरप्लेट लावलेली रिक्षा आढळून आली होती. असे प्रकार घडत असतील आणि त्याबाबत आरटीओ विभागाकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी याबाबत थेट पोलीस ठाण्यांमध्ये कायदेशीर तक्रार करावी. बनावट नंबरप्लेटचा वापर करणाऱ्यांवर निश्चित पोलीस यंत्रणा नियमानुसार कारवाई करेल. ’’ - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर