मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून मिळवा वीजबील संबंधीत घरबसल्या माहिती; २० लाख १३ हजार ग्राहकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:28 PM2020-01-02T14:28:23+5:302020-01-02T14:52:48+5:30

उर्वरित ग्राहकांनीही नोंद कराण्याची मुख्य अभियंता अग्रवाल यांचे आवाहन  

Receive information related to electricity bills from mobile number registration | मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून मिळवा वीजबील संबंधीत घरबसल्या माहिती; २० लाख १३ हजार ग्राहकांनी केली नोंदणी

मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून मिळवा वीजबील संबंधीत घरबसल्या माहिती; २० लाख १३ हजार ग्राहकांनी केली नोंदणी

Next

डोंबिवली: कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडलातील उर्वरित ४ लाख ६८ हजार वीज ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 

कल्याण परिमंडळात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा 'एसएमएस' महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा 'एसएमएस'च्या शेवटी नमूद आहे. या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा यातून ग्राहकांना मिळते. त्यामुळे बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतरही काही तासांमध्ये बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविला जातो. हा 'एसएमएस' बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. 

'एसएमएस' दाखविणाऱ्या ग्राहकांकडे बिलाची मूळ किंवा दुय्यम प्रत मागू नये, अशी सक्त ताकीद सर्व बिल भरणा केंद्रांना देण्यात आली आहे. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीज पुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याबाबत आगाऊ माहिती देणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविण्यात येतो. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केंव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही 'एसएमएस'द्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते.

एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे अशक्य असल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन महावितरणला सादर करण्याबाबतही 'एसएमएस'द्वारे कळविले जाते. वीज कायदा-२००३ चे कलम ५६ (१) नुसार थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे बजावण्यात येते. तेंव्हा परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे तातडीने नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल बंद, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.
 

असा नोंदवा मोबाईल क्रमांक

नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल (अ‍ॅप) अँपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते. 
 

Web Title: Receive information related to electricity bills from mobile number registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.