ठाणे शहरात गुढीपाडवा निमित्त आयोजित स्वागतयात्रा जोशात, जल्लोषात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:36 PM2018-03-18T14:36:32+5:302018-03-18T14:36:32+5:30
ठाणे शहरात गुढीपाडवा निमित्त आयोजित स्वागतयात्रा जोशात, जल्लोषात संपन्न झाली. राजकीय मंडळींची उपस्थिती या स्वागतयात्रेमध्ये होते.
ठाणे : महिलांची बाईक रॅली, लेझीम पथक, ढोल ताशांचा गजर, प्रथमच असलेला सोसायटांचा सहभाग, विविध वेशभूषा, मान्यवरांची मांदियाळी, तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठांची उपस्थिती, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, रांगोळ््यांच्या पायघड्या आदींनी कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागतयात्रा उत्साहात, जोशात पार पडली.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित भारतीय नववर्ष स्वागत यात्रा रविवारी ठाणे शहरात पार पडली. सकाळी पावणे सात वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पालखीस सुरूवात झाली. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे पुजन करुन तेथून पालखीचे प्रस्थान झाले. सुरूवातीला पालखीचे भोई पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर रंगोत्सव बापुजी गुप्ते चौक येथून स्वागतयात्रेस सुरूवात झाली. गोखले रोड येथे मध्यभागी शिवसेनेच्या वतीने व्यासपीठ उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर जाऊन पालखीवर पालकमंत्री, महापौर व इतर राजकीय मंडळींनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. दरम्यान, ‘हर हर महादेव’, ‘कौपिनेश्वर महाराज की जय’, ‘ऊॅँ नम: शिवाय’ चा नारा दिला जात होता. पारंपारिक वेशभूषेत असलेली महिलांची लक्षणीय उपस्थिती यंदाच्या स्वागतयात्रेचे आकर्षण ठरले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर या शाळेचे स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी सायकल यात्रा काढली होती तर काही विद्यार्र्थ्यांचे लेझीम पथक होते. ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठानचे सदस्य टाळ, ढोलकी घेऊन सहभागी झाले होते यावेळी साई बाबांची पालखीचा देखील स्वागतयात्रेत सहभाग होता. झवेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यामंदिर, विद्याभवन वसतीगृह, ठाणेचे विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते. ब्रह्मकुमारी राजयोग सेवा केंद्र, ठाणे या संस्थेचे सदस्य स्वच्छ परिसरचा संदेश देत सहभागी झाले होते. हरियाली या संस्थेच्यावतीने बियाणे आणि रोप वाटप केले. सरस्वती क्रिडा संकुलाच्यावतीने जिम्नॅस्टीकचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. राम मारुती रोड येथे ढोल ताशाचा गजर झाला. ढोकाळी नाका येथील सोसायचीचे २५ रहिवाशी सायकलीला गुढी व भगवे झेंडे लावून सहभागी झाले होते. राम मारुती रोड आणि तलावपाळी येथे तरुणाईची सर्वाधिक गर्दी दिसून आली. झेंडा नृत्य, तलवार नृत्य देखील स्वागतयात्रेत सादर झाले. लक्ष्मीनारायण सोसायटी रेसिडन्सी या सोसायटीचे तब्बल ८० रहिवाशी यात सहभागी झाले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या चित्ररथाने प्लास्टीकचा वापर टाळा असे सांगत ‘घातक प्लास्टीकचा ध्यास, हरवेल पर्यावरणाचा श्वास’ हा संदेश दिला. बाळकुम पाडा नं. ३ येथील कोळी वेशभूषेत सहभागी झालेले मासेमारी दालदी मंडळ देखील आकर्षण ठरले. या मंडळाने आगरी कोळी संस्कृती दाखविली आणि कोळी गीतांवर नृत्यही सादर केले. अनेक चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. दगडी शाळा येथून निघालेली स्वागतयात्रा तीन पेट्रोल पंप - हरिनिवास - गोखले मार्ग, राम मारुती रोड - तलावपाळी - गडकरी रंगायतन या ठिकाणी स्वागतयात्रा समाप्त झाली व पालखीचे विसर्जन श्री कौपिनेश्वर मंदिरात झाले.