परस्पर उद््घाटनाचा घाट? शिवसेनेचा राजकीय डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:25 AM2018-01-05T06:25:20+5:302018-01-05T06:25:27+5:30
उल्हासनगर पालिकेत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत विविध कारणांवरून राजकारण सुरू असून वादाची एकही संधी सोडत नाही. पालिका शाळेचे परस्पर उद््घाटन करण्याचा घाट शिवसेनेने आखला होता. मात्र, निमंत्रणपत्रिकेत महापौर, आयुक्त, शिक्षण मंडळ सभापतींचे नाव नसल्याने हा प्रकार उघड झाला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर पालिकेत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत विविध कारणांवरून राजकारण सुरू असून वादाची एकही संधी सोडत नाही. पालिका शाळेचे परस्पर उद््घाटन करण्याचा घाट शिवसेनेने आखला होता. मात्र, निमंत्रणपत्रिकेत महापौर, आयुक्त, शिक्षण मंडळ सभापतींचे नाव नसल्याने हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे महापौर, आयुक्त या कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ होते. दरम्यान, हे उद््घाटन पुढे ढकलल्याचे महापौर मीना आयलानी यांनी सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं.-४, ओटी सेक्शन, भीमनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १३ व १४ ची पुनर्बांधणी केली. शाळाबांधणीचे काम पूर्ण झाले असून इमारतीचे उद्घाटन करा, असे पत्र शिक्षण समिती सभापती गजानन शेळके यांनी ३० नोव्हेंबरला महापौर मीना आयलानी यांना दिले होते. शाळा इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रणपत्र शिक्षण समिती सभापती गजानन शेळके यांच्या हाती गुरुवारी पडल्यावर धक्का बसला. निमंत्रणपत्रिकेत सभापतीचे नाव नव्हते. शेळके यांनी महापौर आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांना भेटून याबाबत जाब विचारला. तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती नव्हती.
महापौरांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांना फोन करून विचारणा केली. तेव्हा आयुक्तांना याबाबत कल्पना नव्हती, तर प्रशासन अधिकारी मोहिते यांनी शाळा उद्घाटनाबाबतच्या पत्रावर सही केल्याचे कबूल केले. तसेच संपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले.
महापौरांनी विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, उपमहापौर जीवन इदनानी यांना बोलवून कार्यक्रमाची माहिती घेतली. तेव्हा ६ जानेवारीला उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याचे बोडारे यांनी सांगितले.
शाळा उद्घाटन पुढे ढकलले?
महापौरांनी शाळेचे उद्घाटन पुढे ढकलण्याची विनंती विरोधी पक्षनेते बोडारे यांना केली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना बोलवता येईल, असे सुचवले. महापौर, उपमहापौर व आयुक्त यांची कोणतीही सूचना नसताना निमंत्रणपत्रिका कोणी तयार केली, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
उद्घाटन पुढे ढकलणे चुकीचे
उद्घाटन एका दिवसावर येऊन ठेपल्यावर कार्यक्रम पुढे ढकला, असे महापौरांनी सुचवले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी दिली.
निर्णय महापौरांचा
महापौर, उपमहापौर, शिक्षण समिती सभापती आदींना शाळा इमारतीच्या उद्घाटनाबाबत कल्पना नाही. याबाबत, माहिती घेतली तेव्हा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाºयांनी निमंत्रणपत्रिका काढल्याचे उघड झाले. महापौरांनी विरोधी पक्षनेते बोडारे यांच्यासोबत चर्चा केली असून संगनमताने उद्घाटनाचा निर्णय घेणार आहेत, असे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.
सर्वकाही श्रेयाच्या राजकारणासाठी सुरू
उल्हासनगर पालिकेत विकास आराखड्यावरून चांगलेच रणकंदन झाले. आराखड्याविरोधात सेना आक्रमक झाली. तो महासभेत रद्द करावा लागला. त्यामुळे श्रेयाचे राजकारण सुरू राहणार.