कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:46 AM2019-06-29T00:46:51+5:302019-06-29T00:47:03+5:30

कल्याण केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

Recognition of contract carrier recruitment, green lantern of transport committee | कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील

कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील

Next

कल्याण - केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला गेल्याने बसच्या संचालनात वाढ होईल, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे. याआधी एएमसीच्या माध्यमातून कंत्राटी चालक नेमण्यात आले असताना पहिल्या टप्प्यात ५० कंत्राटी वाहक घेतले जाणार आहेत, तर पुढील टप्प्यात २५ वाहकांची नेमणूक केली जाणार आहे.

कंत्राटाच्या माध्यमातून याआधी सुरू करण्यात आलेली वार्षिक देखभाल दुरुस्ती (एएमसी) केडीएमटी उपक्र मासाठी लाभदायक ठरत आहे. सध्या ७५ बस रस्त्यावर धावत आहेत, त्यात एएमसीमुळे बसच्या संख्येत आणखीन ३० ने वाढ होणार आहे. केडीएमटीच्या उपक्रमात २१८ बसचा ताफा आहे. पण, वाहक आणि चालकांअभावी ५० ते ५५ बसच धावत होत्या. वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने मोजक्याच बसचे संचालन सुरू होते. दरम्यान, २०१५ नंतरच्या १० व्होल्वो, १०८ जेएनएनयूआरएम आणि अन्य अशा १३८ बस चालवण्याचे उपक्रमाचे नियोजन आहे. यासाठी वार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटमध्ये चालक आणि वाहक कंत्राटाच्या वतीने उपलब्ध करून या बसमार्गावर चालवण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने समोर ठेवले आहे. यात खर्चात प्रतिकिमी २० रुपये इतकी बचत होऊन बसचा ताफाही वाढण्याचा दावा करण्यात आला आहे. आजघडीला ७५ बससाठी वाहकसंख्या उपक्रमाकडे आहे, पण आता वाढीव बससाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने प्रवासीसंख्या वाढून उपक्रमाचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास परिवहन समिती आणि व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

दुरुस्ती खर्चाच्या प्रस्तावाला स्थगिती

जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारच्या बसदुरुस्तीसाठी आवश्यक असलेले तातडीचे सुटे भाग, टायर्स, बॅटरी व उपक्रमासाठी इतर साहित्यखरेदीस व प्रत्यक्ष झालेल्या खर्चास तसेच बस, इतर वाहने व मशिनरीच्या सुट्या भागांसह दुरुस्तीस व खर्चास मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव व्यवस्थापनाने दाखल केला होता. पण, या एकूणच झालेल्या खर्चाबाबत योग्य प्रकारे माहिती न दिली गेल्याने हा प्रस्ताव सदस्यांकडून तूर्तास स्थगित ठेवण्यात आला. त्यात २०१७ ची बिले उशिराने का दाखल करण्यात आली, हा मुद्दाही सदस्य संजय मोरे यांनी उपस्थित केला. वारंवार दुरुस्तीच्या खर्चांना मान्यता देऊनही बस नादुरुस्त कशा होतात, असा सवाल करताना मे महिन्यात व्होल्वो बस रस्त्यावर धावणे अपेक्षित असताना त्या धावल्या नाहीत, याकडेही संजय राणे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सदस्यांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.

बसथांबे जाहिरातबाजीसाठीच : बसथांब्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा सदस्य स्वप्नील काठे यांनी प्रस्ताव सूचनेद्वारे सभेत मांडला. बसथांब्यांवरील फ्लोअरिंग तुटलेले असून वरचे छत गळके असल्याने पावसाचे पाणी आतमध्ये येत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याकडे काठे यांनी लक्ष वेधले. या बसथांब्यांकडे व्यवस्थापनाचे पुरते दुर्लक्ष झाले असून थांबे केवळ जाहिरातींसाठीच उभे केले आहेत का, असा सवाल काठे यांनी केला. यावर, तातडीने सर्वेक्षण करून थांबे सुस्थितीत आणावेत, असे आदेश सभापती मनोज चौधरी यांनी व्यवस्थापनाला दिले.

Web Title: Recognition of contract carrier recruitment, green lantern of transport committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.