मैदाने विकासकांना आंदण देण्यास मान्यता
By admin | Published: May 21, 2017 03:20 AM2017-05-21T03:20:11+5:302017-05-21T03:20:11+5:30
भाईंदरपाडा येथील मैदान विकासकाच्या घशात घालण्याचा, खाडीचे पाणी शुध्द करुन त्या महागड्या पाण्याची विक्री करण्याचा, गडकरी रंगायतनवर छत टाकण्याचा
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान विकासकाच्या घशात घालण्याचा, खाडीचे पाणी शुध्द करुन त्या महागड्या पाण्याची विक्री करण्याचा, गडकरी रंगायतनवर छत टाकण्याचा हे व असे तब्बल ३९२ प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना अवघ्या अर्धा तासात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांनी शनिवारी मंजूर करवून घेतले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनाही काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची होती. परंतु त्यांनाही चर्चेची संधी नाकारण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या हडेलप्पी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि भाजपाने सभात्याग केला.
भाईंदर पाडा येथील खेळाचे मैदान खाजगी विकासकाला देखभालीच्या नावाखाली देण्याच्या प्रस्तावावरुन मागील काही दिवस चांगलेच रान पेटले होते. ठाण्यातील नगररचना व पर्यावरण तज्ज्ञांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. तसेच खाडीतील प्रदूषित पाणी शुध्द करुन महागड्या दरात विकण्याच्या मुद्द्यावरही उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. असे काही वादग्रस्त व कोट्यवधी रुपयांचा बोजा टाकणारे प्रस्ताव शनिवारी महासभेत चर्चेविना मंजूर करुन सत्ताधारी शिवसेनेने आपल्या ‘हम करसो कायदा’ या प्रवृत्तीचे दर्शन घडवले. आयुक्तांवर तोंडदेखली टीका करणारी शिवसेनेची मंडळी प्रत्यक्षात त्यांच्या कशी इशाऱ्यावर नाचतात हेच आयुक्तांचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरुन स्पष्ट दिसत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
अनेक वादग्रस्त आणि महत्वपूर्ण प्रस्तावांवर चर्चा व्हावी, अशी मागणी महासभेत सुरुवातीलाच सत्ताधारी पक्षाचे सदस्य अशोक वैती यांनी केली होती. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला होता. फेरीवाला आणि रिक्षावाल्यांवरील कारवाईचा मुद्दा गाजल्यानंतर या विषयांवर देखील गांभीर्याने चर्चा होईल अशी आशा सर्वांना वाटत होती. परंतु यापूर्वीची सत्ताधाऱ्यांची खेळी पुन्हा पाहण्यास मिळाली. विषयपत्रिकेला सुरुवात होताच, एका मागून एक विषय मंजूर करवून घेण्याची घाई सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी आम्हाला या विषयांवर चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. परंतु त्यांची मागणी विचारात न घेता, विषयपत्रिका मताला टाकून मंजूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पीठासीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांच्याकडे धाव घेत चर्चेची मागणी केली. परंतु तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या लेखी स्वरुपात द्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तसेच नाराज संजय भोईर यांनीही सभात्याग केला.
- एकाच दिवशी अनेक वादग्रस्त प्रस्ताव पटलावर असतांना त्यावर चर्चा न करता ते मंजूर करुन ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. त्यांच्यासह शहर मनसेने पालिका मुख्यालयात आंदोलन करुन महासभेच्या पटलावरील कागदपत्रे फाडून निषेध व्यक्त केला.
सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला असून आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करुन पुढील दिशा ठरविली जाईल.
- मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते, ठामपा