मानसिक आधाराची गरज ओळखा
By admin | Published: October 5, 2016 02:28 AM2016-10-05T02:28:11+5:302016-10-05T02:28:11+5:30
मनाने खचलेल्यांना कुटुंबाने, परिसरातील लोकांनी मानसीक आधार देण्याची गरज असते
ठाणे : मनाने खचलेल्यांना कुटुंबाने, परिसरातील लोकांनी मानसीक आधार देण्याची गरज असते. जेणे करुन तो पुढच्या क्रोनीक आजारात जाण्याची शक्यता कमी असते. मानसिक आधाराची गरज ओळखून मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले.
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे मंगळवारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात डॉ. त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. जेव्हा एखाद्याचे मानसिक आरोग्य बिघडायला सुरूवात होते तेव्हा त्याला कुटुंबाने कसा आधार द्यावा याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, शरिराबरोबर मन ही निरोगी हवे. शरिर निरोगी असेल पण मन निरोगी नसेल तर जीवन आनंददायी होत नाही. जसे शरिर स्वास्थ्य बिघडल्यावर घरातील वातावरण बिघडते.
तसे मानसीक स्वास्थ्य बिघडल्यावर कुटुंबाचेही स्वास्थ्य बिघडते. प्रथमोपचार म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. मानसिक आरोग्य बिघडलेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते कारण त्यातून त्याला बाहेर पडायचे असते. पुढील आयुष्य जगण्यासाठी आपणच त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी मानसिक प्रथमोपचार - सर्वांकरिता या घोषवाक्यावर आधारीत प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचारिकांनी पथनाट्य सादर केले. यातून आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत करावी. शरिर आणि मन वेगळे नाही त्यामुळे जशी शरिराला प्रथमोपचाराची गरज असते तशी मनालाही असते. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवेचे प्रथमोपचार, मानसीक आरोग्याची तत्काळ परिस्थिती कशी समजून घ्यावी अशा महत्त्वाच्या बाबींवर प्रकाशझोत टाकला. मनोरुग्णालयाच्या प्रभारी अधिक्षक डॉ. उज्ज्वला गुटे - केंद्रे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, १० आॅक्टोबरपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे.
जशी शारिरीक इजा लक्षात घेतली जाते तसे मानसिक इजाही लक्षात घ्या असे सांगत पथनाट्य सादर केलेल्या परिचारिकांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपा किणकर यांनी केले. या सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने गणेशपुरी येथे आरोग्य तपासणी शिबीराचेदेखील आयोजन केले होते. जवळपास १०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)