मांगरूळ डोंगरावरील वनसंपदा पुन्हा वणव्याच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:49 AM2018-11-16T04:49:20+5:302018-11-16T04:49:43+5:30
सलग दुसरी घटना : ७० टक्के वृक्ष जळून खाक
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुसऱ्यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे. या डोंगरावर तीन हेक्टर जागेवर खा. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण केले होते. गेल्या वर्षी हे वृक्ष वणव्यात सापडले होते. त्यानंतरही वनविभागाने पुन्हा ही झाडे जगवली. मात्र, बुधवारी रात्री लागलेल्या वणव्यात ७० टक्के वृक्ष जळाले.
मांगरूळ येथे वनविभागाच्या सुमारे ८० एकर जमिनीवर डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान राबवले होते. तब्बल १५ हजारांहून अधिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावली. या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे, यासाठी शिंदे यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची व्यवस्था केली होती. मात्र, या वृक्षांनी मुळे धरलेले असतानाच गेल्या वर्षी या डोंगरावर वणवा लागला. त्यात ८० टक्के वृक्ष जळाले. सुदैवाने वृक्षांभोवती असलेले सुके गवत काढण्यात आल्याने त्यातील बहुसंख्य वृक्ष वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. जळालेले वृक्ष वाचवण्यासाठी खा. शिंदे यांनीही खाजगी संस्थांची मदत घेत त्या वृक्षांचे संगोपन केले होते.
यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा या वृक्षांची वाढ झाली. एक लाख वृक्षांपैकी ९० टक्के वृक्ष जिवंत ठेवण्यात यश आले. मात्र, बुधवारी रात्री याच डोंगरावर वणवा लागल्याने त्यात अडीच हेक्टर डोंगरावरील सर्वच्या सर्व वृक्षांना झळ बसली. त्यातील काही वृक्ष पूर्ण जळाले, तर काही वृक्षांना वाचवणे शक्य होणार आहे. सलग दोन वर्षे एकाच डोंगरावर वणवा लागून वृक्ष जळत असल्याने वनविभागाचे अधिकारी नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे. एकच चूक दोनवेळा झाल्याने आता त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
उपमुख्य वनसंरक्षकांच्या निलंबनाची मागणी
मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने वनविभागाने कर्मचारी तैनात करणे अपेक्षित होते, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. वृक्षांच्या संवर्धनासाठी संरक्षक कुंपण घालण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. समाजकंटकांकडून आगी लावण्याचे प्रकार होत असल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला आहे. ठाण्याच्या उपमुख्य वनसंरक्षकांना जबाबदार धरून निलंबित करण्याची मागणी वनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.