उल्हासनगर महापालिका आदर्श शाळेची पुनर्बांधणी रखडली, २ कोटीचा निधी पडून
By सदानंद नाईक | Published: December 27, 2023 05:40 PM2023-12-27T17:40:42+5:302023-12-27T17:41:44+5:30
निधी मंजूर होऊनही शाळा पुनर्बांधणीला दिड वर्ष उलटूनही मुहूर्त लागला नसल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगर : शासनाने आदर्श शाळा म्हणून निवड केलेल्या महापालिका शाळा क्रं-२५ च्या पुनर्बांधणी साठी २ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. मात्र निधी मंजूर होऊनही शाळा पुनर्बांधणीला दिड वर्ष उलटूनही मुहूर्त लागला नसल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-२५ ला शासनाने आदर्श शाळा म्हणून १३ मे २०२२ रोजी घोषित करून शाळा पुनर्बांधणीसाठी १ कोटी ९८ लाख ५० हजाराचा निधी मंजूर केला. तर २२ मे २०२२ रोजी ४८ लाख ५५ हजार १४४ रुपयाचा निधी पालिकेला दिले. शासनाने निधी मंजूर करून दिड वर्ष उलटूनही शाळा पुनर्बांधणी बाबत निर्णय घेण्यात आला नाही. शाळा इमारतीच्या जागेला सनद मिळाली असून शाळा बांधणीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची माहिती शिक्षण विभागाच्या लेखा अधिकारी नीलम कदम यांनी दिली. शाळा बांधणीची निविदा प्रक्रिया सुरू केली नाहीतर, शासन निधी परत जाण्याची भीती बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका शाळा क्रं-१८ व २४ या शाळेच्या पुनर्बांधणीचे काम तब्बल ६ वर्षानंतर सुरू झाले. गेल्याच महिन्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या शाळेसाठी महापालिकेने ४ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. तर शाळा क्रं-१७ च्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी ५० लाखाच्या निधीला पालिकेने मंजुरी देऊन शाळा पुनर्बांधणीचे काम सुरू झाले. या शाळेच्या आवारात २ कोटीच्या निधीतून अभ्यासिकाही बांधण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या लेखा अधिकारी नीलम कदम यांनी दिली. टप्याटप्याने महापालिका शाळेच्या इतर इमारतीची पुनर्बांधणी होणार असून गेल्या वर्षी महापालिका शाळा दुरुस्तीवर २ कोटीचा निधी खर्च केल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांत वाढ
महापालिका शिक्षण विभागा अंतर्गत मराठी, हिंदी व गुजराती अश्या एकून २२ शाळा आहेत. शाळेत साडे चार हजार पेक्षा जास्त मुले शिक्षण घेत असून कोरोनानंतर पालिका शाळेच्या विद्यार्थी संख्येत ५०० पेक्षा जास्त मुलांची वाढ झाल्याची माहितीही नीलम कदम यांनी दिली आहे.