फडके रोडवर तरुणाईचा रेकॉर्डब्रेक
By Admin | Published: November 11, 2015 12:13 AM2015-11-11T00:13:03+5:302015-11-11T00:13:03+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची राजकीय धुळवड खाली बसल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील फडके रोडवर तरुणाईमधील अपूर्व उत्साह
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची राजकीय धुळवड खाली बसल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील फडके रोडवर तरुणाईमधील अपूर्व उत्साह, जोश आणि पारंपारिकतेबाबतचा जिव्हाळा याचे दर्शन घडले. परस्परांना दीपावलीच्या शुभेच्छा देतानाच सेल्फी काढणाऱ्या युवक-युवतींच्या चमूंनी पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात कधी ठेका धरला याचे भान त्यांनाही राहिले नाही.
दरवर्षी फडके रोज तरुणाईचा उत्साही जल्लोष पाहायला मिळतो. सलवार-कुर्ता परिधान केलेले किंवा क्वचितप्रसंगी धोतरासारखे पारंपारिक वेश केलेले युवक आणि एरव्ही जीन्स टीशर्टमध्ये वावरणाऱ्या तरुणींनी अंगावर ल्यायलेल्या भरजरी साड्या किंवा अनेकविध पारंपारिक वेश, दागिने यामुळे विविधरंगांनी फडके रोडवरील वातावरण एखाद्या रंगीबेरंगी चित्रासारखे भासत होते.
उपनगराकडे सरकलेल्या मराठी माणसांचे दिवाळी पहाटचे कार्यक्रम सध्या ठाणे, डोंबिवली या सांस्कृतिक पंढरीत रंगू लागले आहेत. डोंबिवलीतील अशा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा बुजुर्ग कानसेन आनंद लुटत असताना फडके रोडवर तरुणाईच्या एकसे एक कलागुणांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना थक्कच केले. महाराष्ट्राची शान असलेल्या पारंपारीक ढोल ताशांच्या तालावर अवघी तरुणाई थिरकत होती. मंगळवारी पहाटे साडेसहापासूनच या परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. आरंभ’ पथकासह ’संस्कृती आणि अन्य पथकांनी ढोल-ताशांच्या गजराने सारा आसमंत निनादून सोडला. ते बघण्यासाठी सांस्कृतिक उपराजधानीत युवकांसह अबालवृद्धांची तोबा गर्दी झाली होती.
गणपती मंदिरात रांगा लावून आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे दर्शन नागरिकांनी पहाटेच सहकुटुंब घेतले. त्यानंतर तरुणाईच्या कलाविष्काराचा आनंद लुटला. पारंपारीक पोषाखासह नवनव्या फॅशनच्या रंगीबेरंगी जथ्यामुळे विशिष्ट ग्रुप घोळक्याने उभे होते. मुला-मुलींनी केलेल्या नाना प्रकारच्या हेअरस्टाइलचीही घोळक्यात चर्चा होती. सकाळी दहानंतर अनेकांचे पालक फडके रोड परिसरात दाखल झाल्याने मित्र-मैत्रिणींच्या चमूंचे नंतर कौटुंबिक एकत्रिकरण झाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माजी शालेय विद्यार्थ्यांचे ग्रुप एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांवरील मंडळीही तरुणाईचा हा सोहळा डोळ््यात साठवण्याकरिता जमतात. डोंबिवली ही कलावंतांची खाण असल्याने चॅनेल्समधील लोकप्रिय कलाकारांनीही फडके रोडवर पायधूळ झाडली. त्यांना पाहण्याकरिता शेकडो माना सहज वळत होत्या. येथील हॉटेल, चाट कॉर्नर्समध्ये पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती.