ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यात २०१० नंतर विक्रमी पावसाची नोंद, सात वर्षात दुसऱ्यांदा झाला असा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:56 PM2017-12-05T16:56:30+5:302017-12-05T17:05:53+5:30
ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यालाही रात्री पासून पाऊस सुरु झाला आहे. परंतु या पावसाने २०१० नंतर सात वर्षात दुसºयांदा विक्रमी पावसाची नोंद केली आहे.
ठाणे : ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे आधीच गारठा आणि त्यात पाऊस यामुळे ठाणेकर मात्र आणखीनच गारठून गेले आहेत. असे असले तरी २०१० नंतरचा दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद मात्र या ओखीमुळे झाली आहे. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मीमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सांयकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. रात्रीपासून आतापर्यंत शहरात १४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर रात्री ठाणे आपत्ती विभागाला १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉक सर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर ६ अशा तक्रारी आल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला मात्र उधाण आले होते. कोपरीतील खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. याशिवाय ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगर पालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला द्यावी जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील दिल्या आहेत.
दरम्यान सोमवारी रात्रीपासून संध्याकाळपर्यंत १४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. २०१० नंतर अधिक पावसाची नोंद यंदा झाली आहे. २०१० मध्ये ३७५७ मीमी पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा ३६२४ मीमी पावसाची नोंद ठाण्यात झाली आहे.