स्वातंत्र्यदिनी जिल्हा रुग्णालयात विक्रमी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:01+5:302021-08-17T04:47:01+5:30
ठाणे : एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा जाणवत असतानाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विठ्ठल ...
ठाणे : एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा जाणवत असतानाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाने दीड हजारांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देत विक्रमी लसीकरणाची नोंद केली.
ठाणे जिल्ह्यात जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाची मोहीम पालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेला काही काळ बंद ठेवावी लागली होती. रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास साळवे तसेच त्यांच्या चमूने जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑफलाइन पद्धतीने पहिला आणि दुसरा डोस असे एक हजार ५६२ जणांचे विक्रमी लसीकरण केले.
* स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयात ही लसीकरण मोहीम राबविली. त्यासाठी लसींचा साठादेखील उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे एका दिवसात दीड हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यश आले.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे