रेडीरेकनरच्या दरानेच भाडे वसूल करा
By Admin | Published: May 24, 2017 01:13 AM2017-05-24T01:13:29+5:302017-05-24T01:13:29+5:30
भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व रेडीरेकनरच्या दरानुसार भाडेआकारणी करण्याचा प्रस्ताव आणून तो चर्चेद्वारे मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केली. महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्याच्या सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या मिलीभगतच्या निषेधार्थ भाजपाने लाक्षणिक उपोषण केले.
मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या महासभेत काही वादग्रस्त आणि तब्बल ४५० कोटींचे प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मिलीभगतच्या विरोधात भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी, आमदार संजय केळकर हेही उपोषणात सहभागी झाले होते. केळकर म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. भाईंदरपाडा येथील भूखंडाचा प्रस्ताव दुरुस्त करुन तो पुन्हा चर्चेसाठी आणावा किंवा रेडी रेकनरच्या दराने भाडेवसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘त्या’ वादग्रस्त ठरावांना स्थगिती द्या
सत्तेचा गैरवापर करीत ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महासभेत मंजूर करवून घेतलेल्या ३९२ प्रस्तावांच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांचा समावेश होता. आव्हाड म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने आयत्यावेळचे ८२ आणि ३९२ असे एकूण ४०० हून अधिक ठराव अवघ्या अर्धा तासात चर्चेविना मंजूर केले.
महासभेत ठराव सर्वानुमते मंजूर होणे अपेक्षित असते. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचेही मत घेणे गरजेचे असते. मात्र, शिवसेनेने कायद्याची सर्रास पायमल्ली केली. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या या कृतीविरोधात राष्ट्रवादी, भाजपा आणि अपक्षांनी गदारोळ घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेने तब्बल ४०० ठराव मंजूर केले. त्याला सरकारने स्थगिती देण्याची मागणी आव्हाड यांनी केली.
महापालिका महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून या सर्व विषयांना यापूर्वीच महासभेने मंजुरी दिली असल्याचा खुलासा शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करायचा होता तर यापूर्वीच करणे गरजेचे होते, असे म्हस्के म्हणाले. भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादीने महासभेनंतर सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असून बहुमताच्या बळावर हडेलप्पी कारभार सुुरु केल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यापासून आंदोलन करण्यापर्यंत पावले उचलून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न चालवले आहेत.
या पार्श्वभूमीवर म्हस्के म्हणाले की, महासभा सुरु होती तेव्हा त्यांना चर्चा करण्यापासून कुणी अडवले होते. केवळ गोंधळ घालायचा आणि सभात्याग करायचा ही पध्दत चुकीची असल्याचा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.खर्चाबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते. परंतु स्थायी समिती गठीत न झाल्याने पुन्हा हे प्रस्ताव पुन्हा महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच प्रस्तावांच्या विरोधात आता भाजपा आणि राष्ट्रवादी बोलत आहे. तुमचा जर विरोध होता, तर यापूर्वीच तो करायला हवा, आधी कामांना मंजुरी द्यायची आणि आता आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावांना विरोध करायचा हा दुटप्पीपणा योग्य नाही, असे म्हस्के म्हणाले.